एचडीएफसी सिक्युरिटीजने ‘पॉवरफुल वॉइसेस इन फायनान्स अवॉर्ड्स’च्या दुसऱ्या पर्वाच्या यशाला जल्लोषात साजरे केले
राष्ट्रीय : एचडीएफसी सिक्युरिटीज या भारतातील अग्रगण्य स्टॉकब्रोकिंग कंपनीने ‘पॉवरफुल वॉइसेस इन फायनान्स अवॉर्ड्स’च्या दुसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन केले. हे प्रतिष्ठित व्यासपीठ आहे, जे देशभरात आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा गौरव करते. हे पुरस्कार अशा संस्था आणि व्यक्तींना दिले जातात, जे भारतातील सर्वात वंचित व्यक्तींना व्यावहारिक आर्थिक शिक्षण पोहोचवत आहेत.
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये विविध प्रभावशाली उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत करणाऱ्या ग्रामीण बचत उपक्रमांपासून डिजिटल पेमेंट यंत्रणा वापरण्याचा आत्मविश्वास मिळवणाऱ्या शहरी महिलांपर्यंत आणि नोकरीत येण्यापूर्वी गुंतवणुकीची मुलभूत कौशल्ये शिकणाऱ्या तरुणांपर्यंतच्या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांनी गरज असलेल्या ठिकाणी दीर्घकालीन आर्थिक स्थिरता निर्माण करणाऱ्या प्रयत्नांना चालना दिली आहे.
या पुरस्कार सोहळ्यात ११ विविध श्रेणींमध्ये विजेत्यांचा गौरव करण्यात आला, ज्यामधून संपूर्ण भारतात सुरू असलेल्या आर्थिक समावेशनाचे वैविध्यपूर्ण काम दिसून येते. यामध्ये ग्रामीण आर्थिक साक्षरता, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, डिजिटल आर्थिक समावेशन आणि युवा व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील उत्कृष्ट कार्याचा समावेश होता.
सीएसआर आणि शाश्वत विकास क्षेत्रातील भारतातील अत्यंत आदरणीय प्रमुखांचा समावेश असलेल्या स्वतंत्र ज्युरीने देशभरातील १०० हून अधिक अर्जदारांचे मूल्यमापन केले. या ज्युरीमध्ये डॉ. भास्कर चॅटर्जी, अभिषेक रंजन, सीता राम गुप्ता आणि डॉ. विवेक प्रकाश यांचा समावेश होता. उपक्रमांचा प्रभाव व व्याप्ती, मापनीय परिणाम, नाविन्यता, शाश्वतता, विस्तारण्याची क्षमता आणि पारदर्शक कारभार यांसारख्या कडक निकषांच्या आधारे सर्वोत्कृष्ट १२ विजेत्यांची निवड करण्यात आली.
‘पॉवरफुल वॉइसेस इन फायनान्स अवॉर्ड्स’ हे व्यासपीठ आर्थिक समावेशनासाठी केल्या जाणाऱ्या क्रांतिकारी प्रयत्नांचा सन्मान आणि प्रसार करण्याचे कार्य करत आहे. अधिक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत घडवण्यासाठी प्रेरणा देणे, हा यामागचा उद्देश आहे.
आर्थिक समावेशनाच्या विजेत्यांचा गौरव: ‘पॉवरफुल वॉइसेस इन फायनान्स अवॉर्ड्स‘ २०२६ ची ठळक वैशिष्ट्ये
एचडीएफसी सिक्युरिटीजद्वारे आयोजित ‘पॉवरफुल वॉइसेस इन फायनान्स अवॉर्ड्स’च्या दुसऱ्या पर्वाने संपूर्ण भारतात आर्थिक साक्षरता आणि समावेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रेरणादायी कथा जगासमोर आणल्या आहेत. या पुरस्कार सोहळ्यातील सन्माननीय विजेते आणि त्यांचे उल्लेखनीय योगदान खालीलप्रमाणे आहे:
- आर्थिक समावेशनातील आजीवन योगदानासाठी सुवर्ण पुरस्कार
आरोह फाऊंडेशन सेंटर फॉर फायनान्शियल लिटरसी
सुवर्ण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या आरोह फाऊंडेशन सेंटर फॉर फायनान्शियल लिटरसीने ७० लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत आपला टप्पा गाठला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्यापलीकडील गरजू व्यक्तींना लक्ष्य करत त्यांनी पथनाट्ये, मोबाइल मोहिमा आणि स्थानिक सत्रांसारख्या कल्पक समुदाय सहभागाद्वारे हे कार्य केले आहे. त्यांचे कार्य व्यक्तींच्या स्वतःच्या भाषेत आणि कथांमधून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यावर भर देते, ज्यामुळे आर्थिक साक्षरतेचे रूपांतर जीवन बदलणाऱ्या साधनामध्ये झाले आहे. त्यांच्या लाभार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक महिला आहेत, ज्यामधून त्यांचे महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष असल्याचे दिसून येते.
- आर्थिक साक्षरतेमधील जीवनगौरव सुवर्ण पुरस्कार
श्री. एन.पी. मोहापात्रा
या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व, एन.पी. मोहापात्रा यांना भारतातील आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी त्यांनी दिलेल्या दशकांच्या समर्पणाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रवासामधून अनेक महत्त्वाचे टप्पे दिसून येतो, जसे प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना सक्षम करणे, महिलांना बचत खाती उघडण्यास मदत करणे आणि तरुण पदवीधरांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रेरित करणे. भारताने आर्थिक शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे, त्यामध्ये त्यांच्या कार्याचे मोलाचे योगदान आहे.
- ग्रामीण आर्थिक साक्षरतेतील उत्कृष्ट योगदान
साईराम इन्स्टिट्यूशन्स
नाविन्यपूर्ण ‘उन्नत भारत अभियान’ उपक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या साईराम इन्स्टिट्यूशन्सने १.३ लाख व्यक्तींशी थेट संवाद साधला आहे. याद्वारे त्यांनी ग्राम सर्वेक्षण, जागरूकता शिबिरे आणि घरोघरी जाऊन प्रचार मोहिमा राबवल्या आहेत. त्यांच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी बचत, विमा, डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजनांची माहिती स्थानिक भाषेत समजावून सांगितली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबे खासगी सावकारांच्या पाशातून मुक्त होऊन अधिकृत बँकिंग यंत्रणांकडे वळली आहेत.
- महिला–केंद्रित आर्थिक सक्षमीकरणामध्ये उत्कृष्ट योगदान
माँ बमलेश्वरी जनहितकारी समिती
१४,००० पेक्षा जास्त महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून या संस्थेने छत्तीसगडमधील महिलांमध्ये सूक्ष्मवित्त, उपजीविका आणि बचतीला प्रोत्साहन दिले आहे. तळागाळातील त्यांच्या प्रयत्नांनी दाखवून दिले आहे की, समुदायाच्या माध्यमातून अंतर्गत बदल शक्य आहे; ज्यामुळे महिला आपल्या आर्थिक भविष्याची धुरा स्वतः सांभाळण्यास सक्षम झाल्या आहेत.
- डिजिटल आर्थिक समावेशनामध्ये उत्कृष्ट योगदान
मंजरी फाऊंडेशन
त्यांच्या डिजिटल सखी उपक्रमाद्वारे उदयपूर, राजसमंद आणि चित्तोडगडमधील महिला’डिजिटल दूत बनल्या आहेत. या महिला आपल्या शेजाऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास आणि डिजिटल पेमेंट करण्यास शिकवत आहेत. २ लाख व्यक्तींपर्यंत पोहोचलेले त्यांचे हे कार्य विश्वासावर आधारित, घरोघरी जाऊन दिलेले डिजिटल शिक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्याचे उत्तम उदाहरण आहे.
- तरूण आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेमध्ये उत्कृष्ट योगदान
आसरा ट्रस्ट
डेहराडूनमधील त्यांच्या स्किलॅबिलिटी सेंटरमध्ये ६०० हून अधिक तरुणांनी कौशल्ये आत्मसात करण्यासोबत कार्यक्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी बजेट बनवणे, गुंतवणुकीच्या मुलभूत गोष्टी आणि फसवणूक रोखण्याचे उपाय शिकून आर्थिक आत्मविश्वासही मिळवला आहे. त्यांच्या एकात्मिक दृष्टिकोनाचा पिढीजात बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.
- आर्थिक शिक्षण मॉडेल्समधील उत्कृष्ट योगदान
राउंड टेबल इंडिया ट्रस्ट
११ दशलक्ष मुलांपर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या सुव्यवस्थित मॉडेल्सनी शालेय वातावरणात आर्थिक जागरूकतेचा समावेश केला आहे, ज्यामुळे मुलांच्या वर्तणुकीत कायमस्वरूपी बदल सुनिश्चित होतो. त्यांच्या कार्यामधून निदर्शनास येते की, मापनीय परिणाम आणि संस्थात्मक भागीदारीद्वारे आर्थिक शिक्षणाचा प्रभावीपणे विस्तार केला जाऊ शकतो.
- आर्थिक साक्षरतेमधील सीएसआर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट योगदान
श्री साईराम इंजिनिअरिंग कॉलेज
सामुदायिक सहभागावर लक्ष केंद्रित करून त्यांनी १० गावे दत्तक घेतली आहेत. डिजिटल साधने, जागरूकता मोहिमा आणि सरकारी योजनांना एकत्र करत त्यांनी २४,००० व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे. याद्वारे त्यांनी शाश्वत आणि समुदाय-नेतृत्वाखालील परिवर्तनाचे मॉडेल तयार केले आहे.
- आर्थिक साक्षरता चॅम्पियन
डॉ. मारिया प्रमिला डिसूझा, वेल्थ२लाइफ
कोंकणी आणि कन्नड यांसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये आर्थिक साक्षरतेला चालना देण्याचे त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी भाषेतील अडसर दूर करून आर्थिक ज्ञान स्थानिक संदर्भात सुलभ आणि समजण्याजोगे बनवले आहे. त्यांच्या समुदायावर आधारित प्रयत्नांमुळे विविध क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये पैशाशी संबंधित विषयांवर अर्थपूर्ण चर्चा सुरू झाली आहे.
- तळागाळातील आर्थिक शिक्षक
डॉ. विनय कंदपाल, एसडब्ल्यूएफआरआय
महिलांच्या आर्थिक स्थिरतेवर संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. कंदपाल यांनी तयार केलेल्या प्रमाणित आराखड्यांमुळे उत्तराखंडमधील स्वयंसहायता गटांतील महिलांच्या आर्थिक क्षमतेचे मोजमाप करणे आणि त्यामध्ये सुधार करणे शक्य झाले आहे. त्यांच्या कार्यामधून खात्री मिळते की, या क्षेत्रातील धोरणे आणि हस्तक्षेप डेटा-आधारित आणि प्रभावी असले पाहिजे.
समर्पण आणि प्रभावाच्या या सामूहिक सोहळ्यामधून आर्थिक साक्षरता आणि सर्वसमावेशक उपक्रमांची परिवर्तनीय शक्ती दिसून येते. एचडीएफसी सिक्युरिटीज या कार्याला पाठिंबा देण्यासाठी आणि या प्रयत्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यामुळे अधिक आर्थिकदृष्ट्या समावेशक भारताची निर्मिती होईल.
