Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक

पुणे : वेगवान लय, हातांच्या तालबद्ध हालचाली, पारंपरिक वाद्यांचा सुरेल नाद आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे बिहू नृत्य खुलले. अस्सल सादरीकरणातून प्रेक्षकांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली.

ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा ‘रोंगाली बिहू’  कार्यक्रम उत्साहात पार पडला. आसाममधील नामांकित नृत्यांगना आणि गायक-गायिकांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून पुणेकर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक बिहू नृत्याबरोबरच सुरेल आसामी संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू शिवाजीराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठकूर, असोमीचे राजीव बोरकटाटी, मौसमी बोरा उपस्थित होते.

कार्यक्रमात रुमा रुलिका भुयान, हिमाश्री मेधी कलिता, अप्सरा गोगोई, निहारिका बोर्गोहैन, जाह्नोबी गोगोई आणि प्रियाक्षी कटक्य या पुरस्कारप्राप्त नृत्यांगनांनी बहारदार सादरीकरण केले. तन्वी गोखरे, आर्या घाटे, खानंडका या पुण्यातील मुलीनी सादर केलेले त्रिपुरा राज्यातील होजगिरी लोकनृत्याने सर्वांचे मन जिंकले.

आसाममधील सुप्रसिद्ध गायक-गायिका निहारिका हजारिका, ध्रुव ठाकुरिया आणि रिपुंजीत यांनी आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या सादरीकरणातून पारंपरिक आणि आधुनिक आसामी संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, आसाम आणि महाराष्ट्राच्या परंपरा व कला प्रकारांमध्ये अनेक साम्य आहेत. आसाममधील वैष्णव परंपरा आणि महाराष्ट्रातील परंपरा यामध्येही साम्य आढळते. या दोन संस्कृतींमध्ये संवाद आणि आदानप्रदान व्हावे, यासाठी दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये सत्रीय नृत्याचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading