Tuesday, March 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

जनसामान्यांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध – गोपाळदादा तिवारी

 

सातारा : राज्यातील सत्ताधारी ‘भाजपधार्जिण्या महायुती’ सरकारने १० हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन गरीब, वंचित आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव रचला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळिमा फासणारा असून, याविरोधात सावित्रीच्या लेकी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारतील, असा इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला.

सातारा येथील पश्चिम महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘नारी शक्तीचा सन्मान – जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्येच्या लेकींचा व जागर संविधानाचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
तिवारी म्हणाले की, मतांच्या फायद्यासाठी महिलांना दरमहा १५०० रुपये देऊन त्यांना परावलंबी बनवण्याचे धोरण चुकीचे आहे. गावकुसातील, वाडी-वस्तीवरील शाळा बंद करून समूह शाळांचे धोरण राबविल्याने डोंगर-पाड्यातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत. याविरोधात काँग्रेस पक्ष ठामपणे लढा देईल.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधींच्या लोककल्याणकारी विचारांवर आधारित धोरणे काँग्रेस पक्षाने नेहमीच राबविली आहेत. १९८० साली मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी अपंग, वृद्ध, निराधार पुरुष तसेच विधवा महिलांसाठी मासिक अनुदान देण्याचा मानवतावादी निर्णय घेतला होता. हा निर्णय निवडणूकपुरता नव्हे तर लोकाभिमुख राजकारणाचे उदाहरण आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे उपस्थित होत्या.
सव्वालाखे म्हणाल्या की, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचे धोरण आणि गरीब मुलांसाठी ‘शिक्षण हक्क कायदा’ काँग्रेस सरकारनेच आणला. नारी शक्तीचा खरा सन्मान काँग्रेसने कृतीतून केला आहे.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रताप विद्यालयात शिकले त्या विद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी संविधान ज्योत पेटवून कार्यक्रमस्थळी आणली आणि संविधान निर्माते बाबासाहेबांना क्रांतिज्योतीरूप वंदन केले.

पश्चिम महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील ५१ शिक्षक-शिक्षिकांचा ‘नारी शक्तीचा सन्मान २०२६’ तसेच ५ शिक्षक पती-पत्नींचा ‘सावित्री ज्योती सन्मान २०२६’ करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशराज पारखी, दाहर मुजावर, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुषमा घोरपडे, मनीषा साळुंखे, श्रीकांत कांबळे, नाना कारंडे, पश्चिम महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे सत्यजीत जाधव, हरिदास चव्हाण, कल्पनाताई शेरे, भारत धावरे, अरविंद जैनापुरे, डॉ. विक्रम गायकवाड, सुरज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन दुर्गाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना शेरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading