सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६ वे वार्षिक अधिवेशन अरण येथे संपन्न
मोडनिंब (प्रतिनिधी):- ग्रंथालय ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून समाजघडणीचे केंद्र असून ग्रामीण व शहरी भागात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
ते अरण (ता. माढा) येथील यशोदा गुरूकुल संकुलाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या ४६ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी
व हरीभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभाप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमास आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, स्वेरी काॅलेजचे संस्थापक प्रा.डाॅ.बी.पी. रोंगे, स्वागताध्यक्ष प्रा. हरीदास रणदिवे, माजी सभापती भारत शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा ग्रंथालय तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील, माजी ग्रंथ निवड समिती सदस्य कुंडलीक मोरे, निरीक्षक संजय ढेरे, राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कार्योपाध्यक्ष राम मेकले, खजिनदार भीमराव पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, दशरथ क्षीरसागर उपस्थित होते.
पुढे बोलताना मोहिते-पाटील म्हणाले की, ग्रंथालय वाचनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करून सामाजिक परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे काम करतात. ग्रंथालय चळवळ मजबूत झाली तरच नवीन पिढी ज्ञानाधिष्ठित आणि सुसंस्कृत होईल, असे त्यांनी सांगितले.
या अधिवेशनास आमदार अभिजित पाटील यांनी उशीरा का होईना प्रमुख उपस्थिती लावत ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. वाचनसंस्कृतीचा विस्तार, सार्वजनिक ग्रंथालयांचे बळकटीकरण आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत अधिवेशनात ग्रंथालय चळवळ अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागताध्यक्ष प्रा.हरिदास रणदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार यांनी आपल्या मनोगतात संघाची प्रगती कशी झाली हे सांगितले. तसेच प्रेरणादायी वक्ते सुभाष रणदिवे यांनी आपल्या व्याख्यानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जिल्हा ग्रंथालय संघाने खुले अधिवेशनात अनेक ठराव पारित करून शासनाकडे पाठविण्याचे ठरविले.
या अधिवेशनाच्या प्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनात जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या अडचणी, वाचकसंख्या वाढवण्यासाठीचे उपक्रम, तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांसाठी एकत्रितपणे संघर्ष करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनामुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीला नवी दिशा व ऊर्जा मिळाली असून, वाचनसंस्कृती जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी संघटित प्रयत्न अधिक तीव्र करण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पांडुरंग सुरवसे, ज्योतीराम गायकवाड, साहेबराव शिंदे, प्रमोद बेरे, विनोद गायकवाड, प्रशांत लोंढे, प्रकाश शिंदे, ॲड.अनिल पाटील, सौ.शैलशिल्पा जाधव, सौ.शैलजा पवार, सौ.सारिका माडीकर, सौ.सारिका मोरे, सौ.वृषाली हजारे, सौ.छाया मोरे सौ.रंजना सरगर, सौ.सुनीता रणदिवे, सौ.नंदा कुऱले, रमा ईपलपल्ली, विलास कदम, शिवाजी नागणे, नामदेव कुचेकर, बाळासाहेब शिंदे, सुभाष सुडके, अमर कुलकर्णी, संजय सरगर, अशोक व्हटे, दत्ता पाटील, प्रथमेश बनसोडे, सोमनाथ लोंढे यांच्यासह साडेचारशे ग्रंथालय प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुप्रिया किरनाळे यांनी केले तर आभार विनोद गायकवाड यांनी मानले.
