Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भाजप, शिवसेना शिंदे गट युतीची शक्यता संपुष्टात

 

स्वतंत्र लढण्याची शिवसेनेकडून घोषणा

पुणे प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली जाणार असल्याची घोषणा केली. तातडीने 165 उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरुवातीपासून शिवसेना शिंदे गट व भाजप युती करून ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. जागा वाटपाच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या चर्चेच्या फेऱ्या अनेक वेळा पार पडल्या. मात्र, शिवसेनेला समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे त्या निष्फळ ठरल्या.

भाजपकडून शिवसेनेला 165 पैकी केवळ 15 जागा देऊ करण्यात आल्या. या जागा देखील आजपर्यंत ज्या ठिकाणी ना भाजपचा उमेदवार निवडून आला ना शिवसेनेचा, अशा असल्याचा आक्षेप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वेळोवेळी घेतला. आपल्याला किमान 25 जागा मिळाव्या, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र, भाजपने ही मागणी मान्य केली नाही.

युती बाबतच्या चर्चा ठप्प झाल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कालपासूनच स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली. मात्र, उपमुख्यमंत्री व पक्षाचे मुख्य नेते उदय सामंत पुण्यात येऊन नेते व शिवसैनिकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असा निरोप आज सकाळी आला. त्यानंतर काही काळ प्रतीक्षेत गेला. मात्र, प्रत्यक्षात उदय सामंत पुण्यात दाखल होण्यापूर्वीच शहर प्रमुखांनी पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading