वेलनेस जीनोमिक्सचा उदय : तंदुरुस्त २०२६साठी भारताचा नवा आराखडा
— डॉ. संदीप शहा, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स
काय खावे, किती व्यायाम करावा आणि कोणती वेलनेस पद्धत अवलंबावी याबाबत अनेक वर्षांपासून आपल्याला ठरावीक सल्ले दिले जात आहेत. पण जर आपले शरीर आपल्याला वेगळीच कथा सांगण्याचा प्रयत्न करत असेल, तर? 2026 कडे वाटचाल करत असताना भारतात ‘सर्वांसाठी एकच आरोग्यसल्ला’ या जुन्या चौकटीतून बाहेर पडत डीएनए-आधारित वैयक्तिक आरोग्यदृष्टीने शांत पण ठळक परिवर्तन घडत आहे. वेलनेस जीनोमिक्स हा विज्ञान आणि स्व-आरोग्यसेवेचा संगम असून, आपल्या शरीराचा अन्न, ताणतणाव, व्यायाम आणि आजारांवरील प्रतिसाद समजून घेण्याची ताकद देतो. जनुकीय माहिती उलगडून हे शास्त्र आपल्याला स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकायला शिकवत आहे.
कल्पना करा, 2026मध्ये तुम्ही अशा वेलनेस योजनेसह पुढे जात आहात जी ट्रेंड्स, इन्फ्लुएन्सर्स किंवा अंदाजावर नव्हे, तर थेट तुमच्या डीएनएवर आधारित आहे. आणि कुटुंबातील आरोग्यविषयक निर्णयांमध्ये मध्यवर्ती भूमिका नेमही महिला बजावतात. वैयक्तिक, प्रतिबंधात्मक आणि शाश्वत आरोग्यजीवनाच्या बदलाची सूत्रधार ठरण्याची ताकद आज त्यांच्या हातात आहे.
तत्त्वतः, वेलनेस जीनोमिक्स व्यक्तीला अन्नसेवन, व्यायाम, ताणतणाव आणि दीर्घकालीन आरोग्यधोके यांवर शरीर कसे नैसर्गिक प्रतिसाद देते हे समजून घेण्याची क्षमता प्रदान करते. प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएमध्ये काही विशिष्ट फरक असतात, ज्यांना जनुकीय मार्कर्स असे म्हटले जाते. हे मार्कर्स शरीरातील अपशिष्ट पदार्थांचे उत्सर्जन, चयापचयाची पद्धत, दाह (Inflammation) आणि वजन वाढणे किंवा घटणे यासारख्या प्रक्रियांवर प्रभाव टाकतात. जनुकीय चाचण्यांद्वारे हे मार्कर्स उलगडले जातात आणि त्यातील गुंतागुंतीची माहिती सोप्या पद्धतीने समजावून दिली जाते. परिणामी, सर्वसाधारण सल्ल्यांचे अंधानुकरण करण्याऐवजी व्यक्तीला अचूक, लक्ष्यित आणि माहितीपूर्ण आरोग्यनिर्णय घेता येतात.
या चळवळीचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे जीन–आधारित आहारयोजनांचा वाढता वापर. आज आहारतज्ज्ञ (डायटिशियन) अधिकाधिक प्रमाणात जनुकीय माहितीचा वापर करून व्यक्तीच्या नैसर्गिक चयापचयानुसार आहार आखत आहेत. उदाहरणार्थ, काही व्यक्ती चरबी सहज पचवू शकतात पण कार्बोहायड्रेट्सबाबत अडचणी येऊ शकतात; तर काहींना प्रथिनांचे प्रमाण वाढवल्यास अधिक लाभ होतो. वैयक्तिकृत आहारयोजना अशा सवयी स्पष्टपणे ओळखून देतात. त्यामुळे पोषणविषयक अंदाजांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि शरीराच्या जैविक गरजांशी सुसंगत आहार स्वीकारता येतो. यामुळे पोषकतत्त्वांच्या कमतरतेचा धोका टळतोच, शिवाय दीर्घकालीन चयापचय आरोग्यही सुरक्षित राहते.
या परिवर्तनात फिटनेस दिनचर्या आणि उद्दिष्टेही मागे राहिलेली नाहीत. जनुकीय चाचण्यांमधून स्नायू विशिष्ट व्यायाम पद्धतींना—जसे की ताकदवाढ (Strength), सहनशक्ती (Endurance) किंवा उच्च तीव्रतेचा इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT)—कसा प्रतिसाद देतात, हे स्पष्ट होते. काही व्यक्तींमध्ये सहनशक्ती लवकर वाढण्याची जनुकीय क्षमता असते, तर काहींमध्ये स्नायूंची वाढ जलद होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आढळते. ही माहिती फिटनेस प्रशिक्षकांना व्यक्तीनुसार कार्यक्रम आखण्यास मदत करते. त्यामुळे उद्दिष्टे साध्य होतातच, शिवाय दुखापती टाळता येतात आणि सातत्यपूर्ण व्यायामाचे स्ट्रॅटेजी तयार होते. भारतामध्ये अवास्तव किंवा शरीराला न झेपणाऱ्या फिटनेस रुटिन्समुळे व्यायाम सातत्याने न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसते. अशा पार्श्वभूमीवर डीएनए-आधारित वर्कआउट्स व्यक्तीला स्पष्ट, व्यवहार्य आणि साध्य होणारे मार्गदर्शन देतात. परिणामी, नियमित व्यायाम करणे सोपे होते आणि फिटनेस ही तात्पुरती सवय न राहता जीवनशैलीचा भाग बनते.
तितक्याच महत्त्वाचा आणि वेगाने विकसित होत असलेला आणखी एक भाग म्हणजे ताणतणाव आणि मानसिक आरोग्य. शरीर ताणतणावाशी संबंधित हार्मोन्स, झोप आणि मनःस्थिती नियंत्रित करणाऱ्या रसायनांना कसा प्रतिसाद देते, हे ठरवणारे काही जनुकीय मार्कर्स आता ओळखता येऊ लागले आहेत. हे मार्कर्स समजल्यावर व्यक्ती अधिक परिणामकारक ताण-व्यवस्थापन पद्धती अवलंबू शकते. म्हणजेच, माइंडफुलनेस, श्वसन-व्यायाम, योग्य झोपेच्या सवयी किंवा अगदी ठरावीक आहारातील बदलही जनुकीय प्रवृत्तींनुसार सुचवले जाऊ शकतात. अशा वैयक्तिक दृष्टिकोनामुळे भावनिक संतुलन आणि मानसिक लवचिकता (Emotional Resilience) अधिक मजबूत होते. विशेषतः वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैली जगणाऱ्या तरुण व्यावसायिकांमध्ये मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा हा वैज्ञानिक, डीएनए-आधारित दृष्टिकोन झपाट्याने लोकप्रिय होत आहे. भावना आणि ताणतणाव यांचे व्यवस्थापन आता केवळ सल्ल्यापुरते मर्यादित न राहता, शास्त्राधारित आणि वैयक्तिक उपायांकडे वळत आहे.
वेलनेस जीनोमिक्सचे कदाचित सर्वात प्रभावी योगदान म्हणजे आजारांचा धोका अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखण्याची क्षमता. जनुकीय चाचण्यांद्वारे एखाद्या व्यक्तीमध्ये मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढवणारे गुणधर्म आहेत की नाहीत, याची माहिती मिळू शकते. ही चाचणी अंतिम निष्कर्ष देत नाही; मात्र संभाव्य धोक्याचे संकेत नक्कीच देते. आणि एकदा का व्यक्तीला आपल्या जनुकांमुळे विशिष्ट आजारांचा धोका असल्याची जाणीव झाली, की प्रतिबंधात्मक उपाय स्वीकारण्याची तयारीही अधिक वाढते. यात नियमित आरोग्य तपासण्या, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे यांचा समावेश असतो—ज्यामुळे आरोग्याची संपूर्ण आणि सुसंगत चौकट तयार होते. ज्या देशात जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत, अशा भारतासाठी अशी जनुकीय माहिती ही आरोग्य व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेली एक महत्त्वाची आणि दूरदृष्टीपूर्ण पायरी ठरते.
या बदलांसाठी आवश्यक असलेले आरोग्यपर्यावरण (ecosystem) झपाट्याने विस्तारत आहे. स्टार्ट-अप्स, डायग्नोस्टिक चेन आणि डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म्स घरबसल्या नमुने संकलन, सहज समजणारे जनुकीय अहवाल आणि व्हर्च्युअल काउन्सेलिंग सत्रे उपलब्ध करून देत आहेत. मोबाइल अॅप्स आणि वेअरेबल्ससोबत जीनोमिक्सचे जुळलेले नाते वैयक्तिक आरोग्य अधिक पारदर्शक आणि मोजमापयोग्य बनवत आहे. आज लोक आपल्या आहार, व्यायाम आणि ताणतणावाची पातळी आपल्या जनुकीय प्रवृत्तींशी किती सुसंगत आहे, हे प्रत्यक्ष पाहू शकतात. यामुळे सातत्याने अभिप्राय देणारी एक ‘फीडबॅक लूप’ तयार होते, जी व्यक्तीला स्वतःच्या आरोग्यवर्तनात बदल करण्यास प्रेरित करते. परिणामी, तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन आणि शाश्वत जीवनशैली बदलांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.
हे निश्चितपणे म्हणता येईल की आरोग्य आणि वेलनेसचे भविष्य पुढील एखाद्या ‘सुपरफूड’ किंवा नव्या ट्रेंडमध्ये नाही, तर आपल्याला आपण बनवणाऱ्या त्या सूक्ष्म जनुकीय कोड्समध्ये दडलेले आहे. विविध जीवनशैली, आहारपद्धती आणि वाढती आरोग्यविषयक चिंता असलेल्या भारतासाठी फिटनेस आणि आजारप्रतिबंधाचा हा वैयक्तिक आराखडा केवळ २०२६पुरताच नव्हे, तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी वेलनेसची दिशा ठरवू शकतो. जिथे आरोग्यसल्ला सर्वसाधारण राहात नाही, तर खऱ्या अर्थाने वैयक्तिक बनतो—अशा वेलनेस जीनोमिक्सच्या युगात आपले स्वागत आहे.
