बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी अॅड. हर्षद निंबाळकर
पुणे: ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. हर्षद वसंतराव निम्बाळकर यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या अध्यक्षपदी विक्रमी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे राज्यातील विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
अॅड. निम्बाळकर हे १९८४ पासून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असून ते पुणे बारमधील एक ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व आहेत. ते पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून २००४ पासून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे निवडून आलेले सदस्य आहेत.
वकिलांच्या व्यावसायिक विकासासाठी त्यांनी आजवर अनेक परिषदा व चर्चासत्रांचे आयोजन केले असून या माध्यमातून वकिलांच्या कल्याणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी विभागाचे अधिष्ठाता (डीन) म्हणून कार्यरत आहेत.
जुलै २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना ‘ज्येष्ठ अधिवक्ता’ (Senior Advocate) पदवी बहाल केली असून, पुणे बारमधून ही मान्यता मिळवणारे ते पहिलेच अधिवक्ता ठरले आहेत.
त्यांच्या तिसऱ्यांदा झालेल्या बिनविरोध निवडीमुळे बार कौन्सिलमधील सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
