Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

पर्यावरण बदलाला सामोरे जाताना मानसिकतेमध्ये बदल आवश्यक – माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मत

पुणे   गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण हा विषय अतिसंवेदनशील झाला आहे. पर्यावरण बदलाला सामोरे जात असताना प्रत्येकाला आपल्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. देशाला शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि  संस्थांचा सन्मान करण्यासाठी जे. पी. श्रॉफ फाउंडेशनतर्फे  सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्कार २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन बोट क्लब येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ.रघुनाथ माशेलकर, प्रदीप भार्गव, गणेश नटराजन, आशिष गायकवाड, जे. पी. फाउंडेशनचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ व सुजाता श्रॉफ आदी उपस्थित होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर  केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव प्रशासकीय अधिकारी कुणाल कुमार, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या महासंचालिक सुनीता नारायण, कोरु कार्टन इंडिया संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप अग्रवाल, अशाया वेस्ट रिसायकल्स प्रा. लि. चे संस्थापक अनिश मालपाणी आणि थरमॅक्स संस्थेच्या अध्यक्षा अध्यक्ष मेहेर पदमजी यांचाही सस्टेनेबिलिटी क्रुसेडर पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्याआधी ‘शाश्वत संस्था, शहरे आणि समाज’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये  केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव प्रशासकीय अधिकारी कुणाल कुमार, नाशिक कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, थरमॅक्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशिष भंडारी व गणेश नटराजन यांनी सहभाग घेतला.

हवामान बदलाची समस्या ही मानव निर्मित आहे. मानवाकडून निर्माण करण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळेच पर्यावरण, हवामान बदल यामधील समस्या वाढत चालल्या आहेत. अलीकडच्या काळात या विषयाची संवेदनशीलता देखील वाढली आहे. हवेची गुणवत्ता खराब होत आहे, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर उत्तर शोधण्यासाठी आपण हॉस्पिटलची संख्या वाढवत जाणार का? असा सवाल प्रभू यांनी यावेळी उपस्थित केला.

पर्यावरण बदलाचा समतोल साधण्यासाठी आपल्याला मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. मानसिकता बदलाची प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेला आपण धर्माची जोड दिली तर ते काम वेगाने होईल. माणूस अनेक समस्या निर्माण करत असतो. त्यामुळे आताच्या पर्यावरणाचा विचार करता  त्याच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला माणसाची मानसिकता हे एकमेव कारण दिसेल, त्यामुळे भविष्यात पर्यावरणाप्रती जागरूक होण्यासाठी प्रत्येकाने मानसिकतेमध्ये बदल करण्यास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रभू यांनी नमूद केले.

शाश्वत विकासासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या शाश्वत संस्था, शहरे आणि समाज’ या चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आले. पृथ्वी चांगली ठेवायची असेल तर पर्यावरणाच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत थरमॅक्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशिष भंडारी यांनी व्यक्त केले. पर्यावरणाच्या विषयाबाबत मुले, पालक, शाळा याठिकाणी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे माजी खासदार वंदना चव्हाण यांनी नमूद केले.

शहरांचा विकास करताना तो पर्यावरणपूरक व शाश्वत असणे हे आता अपरिहार्य झाले आहे, त्यात आपल्याला इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही असे कुणालकुमार यावेळी म्हणाले. नाशिक येथे होणारा कुंभ मेळा भाविकांसाठी सुरक्षित करण्यावर व तिथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यावर आपला भर असेल असे कुंभ मेळ्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले शाश्वत विकासामध्ये  तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक चांगले बदल शक्य आहेत.

पर्यावरणपूरक शाश्वत विकास साधणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून त्यांचे काम लोकांसमोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे इतरांना देखील प्रेरणा मिळेल. शाश्वत विकास मोजण्याचे मॉडेल विकसित करणे महत्वाचे आहे. मोजमाप शक्य झाल्यास कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी योग्य कृती करणे सोपे होऊ शकते असे मत  जे. पी. श्रॉफ फाउंडेशनचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ यांनी प्रास्ताविकात मांडले.

अंकिता व प्रणती श्रॉफ यांनी सस्टेन अँड सेव्ह उपक्रमाविषयी माहिती दिली. सिद्धार्थ भागवत यांनी सूत्रसंचलन केले. नम्रता यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading