Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

‘कोची–मुजिरीस बिएनेल’च्या ‘लेट्स टॉक’ कार्यक्रमाचे शीर्षक प्रायोजक म्हणून किर्लोस्कर समूहाची भागीदारी

 

कोची : भारतातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी समूहांपैकी एक असलेल्या किर्लोस्कर समूहाने कोची–मुजिरीस बिएनेलच्या “लेट्स टॉक” या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून कोची बिएनेल फाउंडेशनसोबत आपली भागीदारी जाहीर केली आहे. दक्षिण आशियातील समकालीन कलेचे सर्वात मोठे आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ‘बिएनेल’मध्ये ‘लेट्स टॉक’ हे व्यासपीठ विचारमंथन, चर्चा आणि संवादासाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. किर्लोस्कर समूहाचे हे प्रायोजन सहा वर्षांपर्यंत असणार असून, सर्जनशीलता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सशक्त कलात्मक परिसंस्था घडवण्यासाठी असलेली या समूहाची दीर्घकालीन बांधिलकी यामधून अधोरेखित होते.

विविध समुदायांतील कलाकारांच्या कलात्मक अभिव्यक्तीला बळकटी देणे आणि त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करणे हा किर्लोस्कर समूहाचा उद्देश आहे. व्याख्याने, परिसंवाद आणि पॅनल चर्चांचा समावेश असलेल्या ‘लेट्स टॉक’ कार्यक्रमाला दिलेले त्यांचे पाठबळ, समकालीन कला, सामाजिक विषय आणि सांस्कृतिक राजकारण यांवरील अधिक सखोल चर्चा व वादविवाद घडवून आणण्यास मदत करेल. सहभागाचा आवाका वाढवून आणि समुदायाशी अधिक दृढ संवाद साधून, हा उपक्रम विचारांच्या देवाणघेवाणीला नवे आयाम देईल.

या भागीदारीबद्दल बोलताना ‘किर्लोस्कर प्रॉपायटरी लिमिटेड’चे व्हाइस प्रेसिडेंट आनंद चितळे म्हणाले, “किर्लोस्करमध्ये आम्हाला ठामपणे वाटते की सर्जनशीलता ही समाज कसा विचार करतो, प्रश्न उपस्थित करतो आणि नवोन्मेष घडवतो याचा मूलाधार आहे. कोची बिएनेल आणि ‘लेट्स टॉक’ या मालिकेसोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी ही कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्याची आणि सांस्कृतिक संवाद अधिक व्यापक करण्याची आमची बांधिलकी दर्शवते. विविध आवाजांना एकत्र आणणाऱ्या, नवे विचार रुजवणाऱ्या आणि भारताच्या सर्जनशील भविष्यास हातभार लावणाऱ्या या व्यासपीठाला पाठिंवा देताना आम्हाला अभिमान वाटतो.”

‘कोची बिएनेल फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस वर्गीस म्हणाले, “किर्लोस्कर समूहाच्या कोची–मुजिरीस बिएनेलसाठी दिलेल्या उदार पाठबळाचे कोची बिएनेल फाउंडेशन मनापासून स्वागत करीत आहे. यापूर्वीही आमची त्यांच्याशी भागीदारी राहिली आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे आम्हाला सहभागाचा आवाका वाढवता येईल, विचारमंथन अधिक सखोल करता येईल आणि भारताच्या सांस्कृतिक संवादाला समृद्ध करणाऱ्या विचारांचा संग्रह पुढेही उभारता येईल. सातत्यपूर्ण सहभाग आणि अर्थपूर्ण संवादाच्या माध्यमातून कलाकार, प्रेक्षक आणि व्यापक समाजाची सेवा करण्याची आमची क्षमता अशा भागीदाऱ्यांमुळे अधिक मजबूत होईल.”

सन २०१२ मध्ये सुरू झाल्यापासून कोची–मुजिरीस बिएनेल हे दक्षिण आशियातील समकालीन कलेचे सर्वात मोठे आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून विकसित झाले आहे. परिवर्तनकारी व्यासपीठ म्हणून व्यापक मान्यता मिळालेल्या या बिएनेलमध्ये जागतिक स्तरावरील कलात्मक प्रयोग, बौद्धिक विचारमंथन आणि व्यापक जनसहभाग यांचा संगम घडतो, तसेच कोचीच्या समृद्ध बहुसांस्कृतिक, बहुजातीय आणि बहुधार्मिक वारशाचा उत्सव यामध्ये साजरा केला जातो. जगभरातील कलाकारांना येथे अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी आणि चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला (इन्स्टॉलेशन), नवी माध्यमे, छायाचित्रण, मुद्रणकला, व्हिडिओ, ध्वनी तसेच वर्धित आणि आभासी वास्तव अशा विविध कला माध्यमांतून महत्त्वाच्या समकालीन विषयांचा शोध घेण्यासाठी भरपूर अवकाश मिळतो.

सहावे बिएनेल १२ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाले आहे. फोर्ट कोची, मट्टनचेरी आणि एर्नाकुलम येथील विविध वारसास्थळे, गोदामे, दालने (गॅलऱ्या) आणि इतर सार्वजनिक जागा येथे या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लेट्स टॉक’ ही परिसंवादांची मालिका ३१ मार्च २०२५ पर्यंत चालणार असून, फोर्ट कोची, मट्टनचेरी, विलिंग्डन आयलंड आणि एर्नाकुलम येथील २९ ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनांचा त्यामध्ये समावेश आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading