खाद्य विक्रीच्या प्रसिद्ध दुकानातून ग्राहकांच्या जीवाशी खेळ
एक्सपायरी डेट संपलेल्या विदेशी खाद्यपदार्थांची बेकायदेशीर विक्री
पुणे : शहरातील उच्चभ्रू उपनगर असलेल्या कल्याणीनगर येथील फूड जंक्शन या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या प्रसिद्ध दुकानात एक्सपायरी डेट संपलेल्या आणि विनापरवाना विदेशातून आयात करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक आनंद गोयल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त आणि येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ख्रिसमस पार्टीसाठी शिवांश करण अग्रवाल या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी फूड जंक्शनमधून काही खाद्यपदार्थांची खरेदी केली. त्याचे वडील करण अग्रवाल यांनी त्याने काय पदार्थ आणले आहेत याची पाहणी करत असताना त्यांना इंडोनेशिया येथून आयात केलेल्या एका खाद्यपदार्थाचे पॅकेट दिसून आले. त्याची एक्सपायरी डेट संपुष्टात आली होती. त्याचप्रमाणे त्यावर स्पष्टपणे ‘केवळ इंडोनेशियात विक्रीसाठी,’ असे नमूद करण्यात आले होते.
ही धक्कादायक बाब लक्षात येतात अग्रवाल यांनी फूड जंक्शनमध्ये धाव घेतली. आपल्याला व्यवस्थापकाशी बोलायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, व्यवस्थापक रजेवर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दूरध्वनीवरून त्यांचे कोणातरी अज्ञात व्यक्तीबरोबर बोलणे करून देण्यात आले. या व्यक्तीचे संभाषण आणि उच्चार अनाकलनीय असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
या गंभीर प्रकारामुळे काही महत्त्वाचे प्रश्न आनंद गोयल यांनी उपस्थित केले आहेत. याची तातडीने दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
केवळ इंडोनेशियात विक्री करण्याची परवानगी असलेले पदार्थ पुण्यात कसे विकले जातात?
बेकायदेशीर व मुदत बाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करणारा सप्लायर अथवा डिस्ट्रीब्यूटर कोण?
ही उत्पादने कोणाच्या परवानगीने भारतात आणण्यात आली?
अशा प्रकारातून लहान मुले व नागरिकांच्या जीवाशी खेळ का?
हा प्रकार केवळ फूड जंक्शनपुरता मर्यादित आहे की याची व्याप्ती राज्यात आणि देशात सर्वत्र आहे?
या प्रश्नांचा त्वरित मागवा घेऊन योग्य ती कारवाई करणे आवश्यक असल्याचे गोयल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे संबंधित दुकान, वितरक, पुरवठादार व अन्य जबाबदार व्यक्तींवर त्वरित गुन्हे दाखल करावे. संबंधित उत्पादने जप्त करून त्याची तपासणी करण्यात यावी. या धोकादायक व बेकायदेशीर उत्पादनांच्या सप्लाय चेनचा मागवा घेण्यात यावा. भारतीय दंड संहिता, p फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍक्ट व अन्य संबंधी कायद्यांच्या आधारे संबंधितांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या देखील गोयल यांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे केल्या आहेत. ही बाब सामाजिक सुरक्षितता आणि मुलांच्या आरोग्याशी निगडित असल्याने याबाबत कारवाई करण्यास विलंब झाला तर ते कमालीचे धोकादायक ठरू शकते, याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले आहे.
