… आणि म्हणून सुरसुंदरींचे शिल्पांकन मंदिरांवर असते….
डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा ‘सुरसुंदरी’ या विषयावरील मास्टर क्लास
पुणे : ईश्वरी शक्तीशी सायुज्यता साधली जावी, हे मानवी आयुष्याचे ध्येय असावे, ही भारतीय विचारधारा आहे. जिवाचे शिवाशी असे ऐक्य साधण्यासाठी मानवी आशा, विकार-वासनांचे बंध दूर ठेवणे आवश्यक आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशण्यापूर्वी पवित्र, स्वच्छ मनाने प्रवेश करण्याचा संकेत देण्यासाठी मंदिरांच्या बाह्यभागावर अनेक ठिकाणी सुरसुंदरींचे शिल्पांकन आढळते, ते प्रतीकरूप आहे, असे प्रतिपादन मूर्तिशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.
पुण्यातील इंडी हेरीटेज व परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘सुरसुंदरी’ (मंदिरांच्या बाह्यभिंतीवरील स्त्री शिल्पे) या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील नवलमल फिरोदिया सभागृह येथे झालेल्या या मास्टर क्लाससाठी परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या परिमल चौधरी, ज्येष्ठ भरतनाट्यम् नृत्यांगना- गुरू डॉ. सुचेता भिडे चापेकर, लेखक आशुतोष बापट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंडी हेरीटेज संस्थेच्या नव्या बोधचिन्हाचे उद्घाटन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मूर्तिकार प्रसाद पाटगावकर यांनी घडवलेली श्रीराममूर्ती डॉ. देगलूरकर यांना यावेळी भेट म्हणून देण्यात आली.
प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यात मंदिराच्या बाह्यांगावर शिल्पित केलेल्या सुरसुंदरींच्या शिल्पांकनामागील संकल्पना डॉ. देगलूरकर यांनी स्पष्ट केली. आपले गुरु डॉ. शां. भा. देव यांच्या सूचनेनुसार डॉ. देगलूरकर यांनी सुरसुंदरी या विषयावर संशोधन केले व महाराष्ट्रातील मंदिरे व मूर्तीकला यासंबंधात एक महत्वाचा परंतु तुलनेने दुर्लक्षित असा विषय जगासमोर आणला.
आपल्या संशोधनाच्या माध्यमातून डॉ. देगलूरकरांनी सुरसुंदरींची नावानिशी ओळख पटवली. तसेच, मंदिरावरील त्यांच्या शिल्पांकनाचे प्रयोजन काय असू शकेल यावर देखील प्रकाश टाकला. डॉ. देगलूरकर म्हणाले, “मनुष्य म्हणजे जीव स्खलनीशील असतो. त्याला ईश्वराची ओढ असते. जिवाचे शिवाशी ऐक्य व्हावे, ही आस असते. मात्र, ईश्वरासमीप जाण्याची योग्यता प्राप्त करण्यासाठी आधी मानवी विकार-वासना, षड्रिपू यापासून मुक्ती आवश्यक आहे. मंदिराचे गर्भगृह हे परमेश्वराचे स्थान मानले जाते. तिथे प्रवेश करण्यापूर्वी जिवाने काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह यांचा त्याग केला पाहिजे. तसेच सलोकता, सरूपता, समीपता, सायुज्यता प्राप्त केली पाहिजे. या मार्गावर नेमके काय स्वीकारावे आणि काय त्यागावे, याचे संकेत सुरसुंदरींची विविध शिल्पे देतात.”
सुरसुंदरी म्हणजे देवांगना. यांचे शिल्पांकन बौद्ध, जैन शिल्पांमध्येही यक्षिणी म्हणून दिसते. पुराणांमध्ये समुद्रमंथनातून सुरसुंदरी प्रकटल्या, असा उल्लेख येतो. पुढच्या काळात शिल्पप्रकाश, क्षीरार्णव आदी ग्रंथांतून सुरसुंदरींची रेखाटने तसेच त्यांची नावे आढळतात. मात्र, त्यांचे प्रयोजन या ग्रंथात दिसत नाही. सुरसुंदरींचे मंदिरांच्या बाह्यभागावरील शिल्पांकनाचे प्रयोजन शोधण्यासाठी आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाची विचारधारा, संतसाहित्य यांचे संदर्भ शोधून, त्यांचे अन्वयार्थ लावावे लागतात, असेही डॉ. देगलूरकर यांनी स्पष्ट केले.
विवेचनाच्या ओघात डॉ. देगलूरकर यांनी दर्पणा, पद्मगंधा, नुपूरपादिका, शुकसारिका, पुत्रवल्लभा, मानिनी, आलसा, मर्कटसहिता, पत्रलेखिका, मुग्धा, जया, मर्दला, कर्पूरमंजिरी, शुभगामिनी, तलवारधारी मेनका…अशा सुरसुंदरींची शिल्पे दाखवून, त्यामागील प्रयोजनाची माहिती सांगितली.
त्यजेत् अज्ञाननिर्माल्यम् (अज्ञानरूपी निर्माल्याचा त्याग करा) असा संदेश देणाऱ्या या सुरसुंदरींचे शिल्पांकन, एखादे प्रमेय, तत्त्व स्पष्ट करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दृष्टान्ताप्रमाणे आहे, असेही ते म्हणाले.
स्वागतपर प्रास्ताविक करताना इंडी – हेरीटेजचे तुषार जोशी म्हणाले, इंडी हेरीटेजतर्फे आयोजिण्यात आलेला हा पाचवा उपक्रम आहे. डॉ. देगलूरकर यांचे ४ मास्टरक्लास आणि अभ्यासकांशी संवादसत्र, असे उपक्रम इंडी हेरीटेजतर्फे झाले आहेत. यापुढेही विविध विषयांवरील मास्टरक्लास आणि संवादसत्रे आयोजित करण्यात येतील. स्नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
