Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सीपच्या अध्यक्षपदी शिवराज साबळे यांची निवड

 
पुणे : पुण्याचे शिवराज साबळे यांची सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड घोषित करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेच्या विकासदृष्टीला नवे नेतृत्व मिळाले आहे.

सॉफ्टवेअर अभियंते असलेले शिवराज साबळे ग्लोबंट इंडिया प्रायव्हेट लि. या संस्थेचे भारताचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे लीडिंग इज टेक्नॉलॉजीवरील डिजिटल ट्रांसफॉर्मेशन प्रोग्राम चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, याशिवाय संस्थेचे आशिया पॅसिफिक ऑपरेशन्स वाढविण्यामध्ये देखील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज हे सीपच्या परिसंस्थेत सक्रिय आहेत. तंत्रज्ञान उपक्रमांवर लक्ष केंद्रित करीत सीपचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी नुकताच आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.

याबरोबरच नव्याने स्थापन झालेल्या सीपच्या कार्यकारिणीमध्ये शिवेश विश्वनाथन यांची उपाध्यक्ष, विद्याधर पुरंदरे यांची सचिव व आनंद रानडे यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे. यां सर्वांचाच कार्यकाळ २०२५ ते २०२७ असा दोन वर्षांचा असेल.

याबरोबरच सीपच्या कार्यकारी समितीमध्ये विनिता गेरा, अश्विन मेघा, अभिजित अत्रे, प्रणाली सावे, मंजिरी शिंदे, भालचंद्र नामजोशी, विश्वास महाजन, धनश्री भट, आमोद देशपांडे आणि स्नेहा उत्तुर्वार यांचा समावेश आहे. याशिवात नितीन देशपांडे, रामप्रसाद एस,  आशुतोष पारसनीस, प्रशांत केएस हे कार्यकारी समितीचे सल्लागार म्हणून काम पाहतील.

शिवराज साबळे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून झाले असून त्यांनी सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. डेव्हलपमेंट, डिलिव्हरी आणि कॅपॅसिटी क्षेत्रात त्यांनी विविध भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

१९९८ साली पुण्यातील सॉफ्टवेअर निर्यातदारांची संघटना म्हणून सीपची स्थापना करण्यात आली असून विविध सरकारी संस्थांशी संवाद साधणे व सदस्य सॉफ्टवेअर कंपन्यांना विविध स्तरावर आवश्यक मदत करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुणे परिसरातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे १२५ हून अधिक संस्था या सीपच्या सभासद आहेत.

गेली अनेक वर्ष पुणे शहरातील सॉफ्टवेअर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासोबतच संघटित ठेवण्यासाठी सीप कार्यरत आहे. नेतृत्त्व, तंत्रज्ञान, गो टू मार्केट ऑपरेशनल एक्सलन्स तसेच ईएसजी या पाच महत्त्वाच्या विभागात सीप प्रामुख्याने काम करते हे विशेष.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading