बालगंधर्व, ज्योत्स्ना भोळे यांनी शास्त्रीय व नाट्य संगीतामधून महाराष्ट्राची संतपरंपरा जपली – उल्हास पवार
पुण्यातील सृजन फाऊंडेशन यांच्या वतीने आणि नांदेड सिटीच्या संयुक्त विद्यमाने १४ व्या दोन दिवसीय ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या स्वरोत्स्वाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी महोत्सव सुरु असून डॉ. सुनील काळे महोत्सवाचे आयोजक अधिश प्रकाश पायगुडे, सह आयोजक पं शौनक अभिषेकी, वंदना खांडेकर, हे देखील यावेळी उपस्थित होते.
मराठी शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत क्षेत्रातील एक असामान्य कलाकार असलेल्या विदुषी ज्योत्स्ना भोळे यांना सांगीतिक मानवंदना देण्याच्या हेतूने सृजन फाऊंडेशन गेली ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करीत आहे. याद्वारे शास्त्रीय संगीत व नाट्य संगीताची मेजवानी रसिकांना मिळावी असा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.
आजच्या उद्घाटन प्रसंगी फाऊंडेशनच्या वतीने मागील वर्षीपासून देण्यात येणारा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध निवेदिका, लेखिका म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या मंगला खाडिलकर यांना उल्हास पवार व डॉ. सुनील काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रुपये दहा हजार एक रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याबरोबरच शास्त्रीय संगीताचे पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या आकाश नाईक व स्वप्नील सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या वतीने आज शिष्यवृत्ती देखील प्रदान करण्यात आली. प्रत्येकी पंधरा हजार रुपये रोख असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना उल्हास पवार म्हणाले की, “एक काळ असा होता की मराठी नाट्यभूमी लयाला गेली असताना पारशी व गुजराथी माणसांनी तिला मदत केली. त्या काळी मुंबईच्या ओपेरा हाउसमध्ये संगीत नाटके होत होती, आणि यानेच या रंगभूमीला हातभार लागला. त्यावेळी ज्योत्स्ना भोळे यांचे गाणे अवखळ, लडीवाळ आणि स्वरांची मोहिनी घालणारे होते. १९३२ ते १९६५ हा काळ त्यांनी खऱ्या अर्थाने गाजविला.”
ज्योत्स्ना भोळे यांची आठवण सांगताना पवार पुढे म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान असलेले नरसिंह राव स्वातंत्र्यपूर्व काळी पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात शिकायला होते. ते महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवासाठी १९८५ साली पुण्यात आले असताना त्यांनी ज्योत्स्ना भोळे आहेत का ? त्यांना भेटता येईल का असे मला विचारले. तेव्हा नरसिंह राव ज्योत्स्नाताई यांना कसे ओळखतात असा प्रश्न मी त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की, निजामाने आम्हाला हद्दपार केल्यानंतर आम्ही पुण्यात शिकायला आलो. त्या काळी महिन्याला घरून आम्हाला तीन रुपये खर्चासाठी यायचे. त्या वेळी आम्ही जेवण, शिक्षणाच्या पैशातून काही पैसे वाचवायचो आणि ज्योत्स्ना ताई यांची संगीत नाटके पाहायचो.” यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख हे राजकारणी देखील असेच कलाकारांची जाण असणारे होते. त्यामुळे राजकीय व्यक्तींबद्दल गैरसमज करून घेऊ नयेत तेही रसिक असतात, असेही पवार यांनी सांगितले.
समाजकारण, राजकारण या क्षेत्रात अनेक जण हे मॅन्युप्ल्युशन करून पुढे जातात, ज्यांना हे जमत नाही ते मागे राहतात. मात्र या क्षेत्रात मंगला खाडिलकर यांनी आपले स्थान अबाधित ठेवले आहे आणि तेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आजच्या पुरस्काराला त्यांच्यामुळे मान प्राप्त झाला असे सांगत पवार यांनी मंगला खाडिलकर यांचे कौतुक केले.
निवेदनाचा माझा प्रवास हा ४५ वर्षांचा आहे, या काळात अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे, कलाकार यांच्याशी जवळून संवाद साधण्याची, त्यांच्या बरोबर वावरण्याची संधी मिळाली. पंडित जितेंद्र अभिषेकी हे तर माझ्यासाठी दीप स्तंभाप्रमाणे होते. त्यांनी माझ्या निवेदनाला दिलेली दाद माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती अशी आठवण खाडिलकर यांनी सांगितली. एक प्रामाणिक कार्यकर्ता, रसिक आयोजक, जाणकार क्रीडा समीक्षक, सामाजिक भान असलेले व्यक्तीमत्त्व असलेले प्रकाश पायगुडे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार महत्त्वाचा असल्याचेही खाडिलकर म्हणाल्या.
डॉ. सुनील काळे म्हणाले, “संगीताद्वारे उपासना करणाऱ्यावर देव कायमच प्रसन्न होतो असे म्हणतात, म्हणूनच कलाकार हे संपन्न असतात. कलाकार हे स्वर्गातली दरबारातील माणसे असतात. आपण केवळ भक्त म्हणून त्यांच्या पायाशी बसावे असे मला कायमच वाटते. शास्त्रीय कलाकार हे आजच्या काळात संतांचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”
महोत्सवाच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट करीत अधिश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले तर रत्ना दहिवेलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
