Wednesday, May 20, 2026
Latest NewsSports

पुणे जिल्हा संघाने पटकावले तृतीय स्थान !! मुंबई संघाला विजेतेपद !!

पुणे  वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलांच्या (१३ वर्षाखालील) गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने पालघर संघाचा २-१ असा पराभव करून स्पर्धेतील तृतीय स्थानाचे विजेतेपद मिळवले. मुंबई संघाने ठाणे संघाचा २-० असा पराभव विजेतेपद निश्चित केले.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्हा संघाच्या ओम शिंदे याने दोन गोल करून सामन्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ओम शिंदे याने २० व्या मिनिटाला गोल करून पुणे संघाला १-० आघाडी मिळवून दिली. पुर्वार्धामध्ये ही आघाडी पुणे संघाने टिकवून ठेवली होती. उत्तरार्धाच्या सुरूवातीलाच पालघर संघाच्या चिन्मय कुलकर्णी याने गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी निर्माण केली. त्यानंतर पुणे संघाने जोरदार प्रतिआक्रमण रचून पालघर संघावर दबाव निर्माण केला. त्यानंतर ४३ व्या मिनिटाला ओम शिंदे याने गोल करून पुणे संघाला २-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. पूर्णवेळ ही आघाडी कायम ठेऊन पुणे संघाने तिसर्‍या स्थानावर आपले नाव निश्चित केले.

याआधी स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये पुण्याला ठाणे संघाकडून १-० असा स्विकारावा लागला आणि पुणे संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले होते. उपांत्य फेरीमध्ये दाखल होताना पुणे संघाने हिंगोली संघाचा ६-० असा तर, उप-उपांत्यपुर्व फेरीमध्ये रायगड संघाचा २-१ असा पराभव केला होता. पुणे संघासह स्पर्धेत अमरावती, अकोला, हिंगोली सातारा, ठाणे, अहमदनगर, पालघर, अमरावती आणि मुंबई हे संघ सहभागी झाले होते.

सामन्याचा सविस्तर निकालः तृतीय स्थानासाठीची लढतः
पुणे जिल्हा संघः २ (ओम शिंदे २०, ४३ मि.) वि.वि. पालघर संघः १ (चिन्मय कुलकर्णी ३५ मि.); पुर्वार्धः १-०; सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः ओम शिंदे;

अंतिम सामनाः मुंबई फुटबॉल संघटनाः २ (अनय सराफ २२ मि., नील वर्मा ५२ मि.) वि.वि. ठाणे संघः ०;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading