‘पारा गर्निका’ कार्यक्रमाचे येत्या २७ एप्रिल रोजी आयोजन
पुणे : मानवाचा इतिहास म्हणजे एक रक्तरंजित पानांनी भरलेला ग्रंथ आहे असे आपण म्हणूच शकतो. गेली अनेक शतके आपण हा इतिहास वाचत आलो आहोत. आजवर रोगांच्या साथींमध्ये मिळून मेली नसतील इतकी माणसे देश, धर्म, वंश, वर्ण अशा मानवनिर्मित संकल्पनांसाठी माणसांनीच मारली आहेत.
भारतीय युद्ध, पांडवांनी केलेलं खांडववन दहन, सर्पसत्र, परशुरामाने केलेला क्षत्रिय संहार, आजवर झालेली अनेक धर्मयुद्धे, चेंगीजखान, हिटलर, पॉल पॉट, इदी अमीन यांसारख्या नराधमांनी केलेल्या हत्या, आफ्रिकेतील वांशिक हत्याकांडे, दहशतवादी संघटनांनी केलेले विध्वंस, ९/११ सारखे हल्ले, जगभरात झालेले बॉम्बस्फोट, हिरोशिमा सारखे अणुबॉम्ब हल्ले, दोन्ही जागतिक महायुद्धे, अगदी आजचे रशिया युक्रेन युद्ध इथवरचा हा प्रवास आहे. याचा परिपाक म्हणजे जगभर भरडली जाणारी सामान्य माणसे, स्त्रिया, बालके आणि त्यांचा आक्रोश हा होय.
याविषयी अधिक माहिती देताना प्रमोद काळे पुढे म्हणाले की, “एकाधिकारशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या स्पेनच्या जनरल फ्रँकोने स्पेनवर आपली पूर्ण सत्ता असावी या आशेने नाझींशी हातमिळवणी केली आणि २६ एप्रिल, १९३७ साली नाझींनी गर्निका शहरावर बॉम्ब हल्ले करीत संपूर्ण शहर बेचिराख केले. यामध्ये मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, नागरिक मारले गेले. या घटनेवर आधारित प्रसिद्ध चित्रकार पाबलो पिकासो याने काढलेले ‘गर्निका’ हे पेंटिंग पुढे खूप प्रसिद्ध झाले. पारा या शब्दाचा अर्थ स्टॉप अर्थात थांबवा, यावरून ‘पारा गर्निका’ या कार्यक्रमाची संकल्पना समोर आली.”
सदर कार्यक्रमामध्ये स्वत: प्रमोद काळे हे सहभागी असतील तर प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि नरेश गुंड हे विद्रोही कवितांचे अभिवाचन करणार आहेत. अशा प्रकारचा पुण्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे काळे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कवी गणेश विसपुते यांनी भाषांतरीत केलेल्या कविता सादर करण्याची परवानगी दिली आहे हे विशेष.
