‘दगडूशेठ’ तर्फे महाआरोग्य शिबीरात १२ हजार ७६९ जणांची रुग्णसेवा
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे एकाच छताखाली विविध ६४ विभागांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीरात १२ हजार ७६९ जणांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले. पुणे शहरासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या विविध तपासण्या करीत साहित्य व औषधे वाटप देखील करण्यात आले. याकरिता ५९ रुग्णालये आणि ५ संस्थांचे ४०५ तज्ञ व कार्यकर्ते शिबीरात अखंड ९ तास सेवा देत होते.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव चे गोपाळ गीते यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबीरात ह्रदय आजार, कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करून देण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती देखील देण्यात आली, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले.
ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण आणि आरोग्य या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न ट्रस्ट करीत आहे. यामाध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे. मागील वर्षी तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांना आरोग्यसेवा देण्यात आली. तर, त्याआधीच्या वर्षी ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली होती. यापुढेही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे पिनॅकल ग्रुपचे अध्यक्ष व उद्योजक सुधीर मेहता यांनी दिलेल्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते झाले. सिल्व्हर बीर्ज रुग्णालय याचे व्यवस्थापन करणार असून सर्व सुविधा ५० टक्के दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. यंदा महाआरोग्य शिबीराकरिता ९ हजार १६२ नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे या महाआरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालये आणि विविध संस्थांमधून आरोग्यसेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते.
दत्तवाडी येथील शोभा जाधव म्हणाल्या, डॉक्टरांनी माझी तपासणी करीत पायाचे माप देखील घेतले. त्यामुळे आता मला ट्रस्टच्या माध्यमातून मोफत पाय मिळणार असून याचा मला आनंद आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे आरोग्यसेवेचे कार्य उत्तम असून अधिकाधिक लोकांना याचा लाभ व्हावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
तब्बल १३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य सेवा
ट्रस्टच्या एकूण १३ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅनसह कार्डियाक रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
