Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

येत्या १० ते १३ एप्रिल दरम्यान पुण्यात रंगणार ‘मंच नाट्य महोत्सव’

पुणे  : नाट्य निर्मिती क्षेत्रातील नवकल्पनांसोबतच स्वतंत्र नाट्य निर्मात्यांना आपल्या समर्पित प्रयत्नांद्वारे सक्षम बनविणारी नाट्य संस्था म्हणून ओळख असणाऱ्या बंगळूरुस्थित भाषा सेंटरच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच मंच नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या गुरुवार दि. १० एप्रिल ते रविवार दि. १३ एप्रिल दरम्यान सदर महोत्सव टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या श्रीराम लागू रंग अवकाश येथे संपन्न होईल. डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो यांच्या विशेष सहकार्याने आयोजित मंच नाट्य महोत्सवादरम्यान पुणेकर रसिकांना नाटकांची मेजवानी तर मिळणार आहेच शिवाय तज्ज्ञांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधीही मिळेल. या महोत्सवातील कार्यशाळा आणि नाटके ही सशुल्क असून काही उपक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.

मंच नाट्य महोत्सवाचे उद्घाटन १० एप्रिल रोजी सायं ६.३० वाजता नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्ट्स अर्थात एनसीपीएच्या नाट्य व चित्रपट विभागाचे प्रमुख ब्रूस गथ्री यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी गथ्री हे ‘लुकिंग बियाँड परफॉर्मन्स’ या विषयावर बीजभाषण करतील. यानंतर सुप्रसिद्ध नाटककार इरावती कर्णिक या गथ्री यांच्याशी संवाद साधतील. सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

महोत्सवाबद्दल सांगताना भाषा सेंटरचे विवेक मदन म्हणाले, “प्रायोगिक रंगभूमीचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने भाषा सेंटर कार्यरत असून आम्ही पहिल्यांदाच पुण्यामध्ये मंच नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. याद्वारे आम्हाला पुण्यातील प्रेक्षकांशी जोडण्याची आणि आमचा दृष्टीकोन विस्तारण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच नाट्यनिर्मात्यांसाठी एक शाश्वत संधी निर्माण व्हावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांची आर्थिक व्यवहार्यता जपणे आणि आणि उत्कृष्ट नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हा महोत्सवामागील महत्त्वाचा उद्देश आहे.”

यासोबतच समकालीन नाट्यलेखनाच्या उपलब्धतेची गरज पूर्ण करण्यासाठी उभारण्यात आलेली http://www.thedramalibrary.com ही भारतातील अप्रकाशित नाटकलेखनाची एकमेव डिजिटल लायब्ररी रसिकांसाठी या महोत्सवादरम्यान विनामूल्य उपलब्ध असेल असेही मदन म्हणाले.

द ड्रामा लायब्ररी (टीडीएल) ही जून २०२२ मध्ये सुरू झाली असून या लायब्ररीमध्ये आता १० भारतीय भाषांमधील ४०० हून अधिक संहिता आहेत. यांमध्ये इरावती कर्णिक, नील चौधुरी, चाणक्य व्यास, चंप्रा देशपांडे, युगंधर देशपांडे, शिल्पा कांबळे, अ‍ॅनी झैदी आणि इतर अनेकांची नाटके इच्छुकांना वाचता येणार आहेत.

मंच नाट्य महोत्सवादरम्यान शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सायं ७ वाजता ‘आय किल्ड माय मदर/ इट वॉजंट माय फॉल्ट’ हे मल्लिका शाह दिग्दर्शित नाटक सादर होईल. यानंतर १२ एप्रिल रोजी सायं ५ व सायं ७.३० वाजता ‘दी ओपन कपल’ या फराझ खान दिग्दर्शित नाटकाचे दोन प्रयोग होतील. रविवार दि. १३ एप्रिल रोजी नील चौधुरी दिग्दर्शित ‘रिहला’ या नाटकाचे सायं ५ व ८ वाजता दोन प्रयोग संपन्न होतील

यासोबतच महोत्सवादरम्यान सात्विका कठंमनेनी यांचे ‘वूमेन इन ब्लॅक्स’ या खास महिलांसाठीच्या नाट्य निर्मितीवरील कार्यशाळा, ‘चला लाईक्स येऊ द्या’ ही मेघना ए टी यांची कार्यशाळा, ‘स्टेज टू पेज’ ही रंगभूमीविषयक लिखाणासाठीची कार्यशाळा, ‘वाव विथ अभय महाजन’ ही अभय महाजन यांसोबतची विशेष कार्यशाळा संपन्न होईल.

रविवार दि. १३ एप्रिल रोजी दुपारी २.३० ते सायं ४.३० दरम्यान ‘पिकनिक विथ प्लेराइट्स हा विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला असून यामध्ये प्रसिद्ध नाटककार मनस्विनी लता रवींद्र आणि धर्मकीर्ती सुमंत यांच्यासोबत रसिकांना संवाद साधता येणार आहे. या कार्यशाळेदरम्यान हे दोघेही स्वतःच्या काही कलाकृतींचे वाचन करतील किंवा इतर साहित्यकृतींमधील त्यांचे आवडते उतारे देखील उपस्थितांसमोर सादर करतील. सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading