Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

एआयच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची प्रगती करणे शक्य; डॉ. विवेक सावंत

पुणे  : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कोणतीही स्पर्धा नाही, उलट त्या माध्यमातून चांगल्या प्रकारची प्रगती साध्य होऊ शकते, त्यामुळे आताच्या परिस्थितीत त्याचा योग्य लाभ घेण्यासाठी मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे प्रमुख डॉ. विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई)आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या  ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेप्रसंगी बीजभाषण करताना डॉ. सावंत बोलत होते.

एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेचे वाढते प्रमाण, त्याद्वारे होत असलेले मूलभूत बदल व नजीकच्या भविष्यातील संभाव्य धोके या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना यामध्ये एआय कसे प्रभावीपणे काम करू शकते, हे समजून घेण्याच्या उद्देशाने कोथरूड, मयूर कॉलनी येथील एमईएस शाळेच्या सभागृहात या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सावंत यांनी ‘मानवी बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशीयल इंटेलिजन्समधील भागीदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रीय मंडळ व एमईएसचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले, शिक्षण संचालक नेहा दामले, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ. श्रद्धा नाईक, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, एमईएसच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक डॉ. उमेश बिबवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आर्टिफिशीयल इंटेलिजन्सने प्रत्येक क्षेत्रातच प्रगती केली आहे, याची माहिती अनेक उदाहरणांसह देत डॉ. सावंत म्हणाले, “एआयमुळे नोकरीमधल्या श्रेणीमध्ये बदल होऊ शकतो. पूर्वीच्या  काळी टांगा होता, त्याची जागा रिक्षाने घेतली. त्यामुळे हा नवा बदल आपण स्वीकारला त्याच प्रमाणे एआयच्या माध्यमातून होणारे बदल हे आपली क्षमता ओळखून काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे.”

मानवी बुद्धिमतेमध्ये स्वप्न, भावना असे अनेक गुण असतात. अलीकडच्या काळात आलेल्या एआयमुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. उलट एक चांगल्या प्रकारचा भागीदार म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. इतकेच नव्हे तर एआयचा योग्य उपयोग करून प्रगती करणे शक्य आहे, याकडे डॉ. सावंत यांनी लक्ष वेधले.

कृत्रिम बुध्दितमत्तेचा वापर करून मोबाइलमध्ये अनेक प्रकारची अॅप तयार करण्यात आली आहेत, त्यांची संख्या मोठी असेल. मराठीमध्ये टायपिंग करण्यापासून ते अनेक ठिकाणी त्याचा योग्य प्रकारे वापर केला जातो, या नव्या तंत्राचा लोक मोठ्या प्रमाणात फायदा घेत असल्याचे डॉ. सावंत यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading