पुणेकरांना अनुभवता येणार शाश्वत जीवनशैली अधोरेखित करणारे प्रदर्शन – ग्रीन अंब्रेला
पुणे : आपल्या २०२४ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या यशस्वी प्रदर्शनानंतर ग्रीन अंब्रेलाच्या संस्थापिका असलेल्या प्रणती श्रॉफ मुनोत आणि चैताली गाला या दोघी आपले आगामी प्रदर्शन ग्रीन अंब्रेला २.० पुण्यामध्ये आयोजित करीत आहेत. या प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे हे शाश्वत आणि पर्यावरण पूरक जीवनशैली वर आधारित असणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन शनिवार दिनांक १ मार्च रोजी रॉयल बोट क्लबमधील पोचा हॉल येथे करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे वैशिष्ठ म्हणजे याद्वारे विविध प्रकारच्या प्रदर्शकांना एकत्र आणले जाते. यामध्ये फॅशन, तंत्रज्ञान, आरोग्य अशा अनेक विषयांना घेवून सुरु केलेले नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे सगळे ब्रँडस पर्यावरण-पूरक असणार आहेत.
आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना ग्रीन अंब्रेलाच्या संस्थापिका, प्रणती श्रॉफ मुनोत म्हणाल्या, “ग्रीन अंब्रेला हे एक असे प्रभावशाली ग्राहक प्रदर्शन आहे जिथे ग्राहकांना अप-सायकल केलेल्या साहित्यांपासून बनवलेले स्टायलिश, नाविन्यपूर्ण फॅशन तसेच सेंद्रिय अन्नाचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. इथे प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक ब्रँडची स्वतःची प्रेरणादायी आणि अनोखी कथा आहे. त्यामुळे हे प्रदर्शन म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूक ग्राहकांसाठी हे नेमके माध्यम ठरेल यात शंका नाही.
ग्रीन अंब्रेला हे अनोखे प्रदर्शन फक्त विविध उत्पादने प्रदर्शित करण्याबरोबरच असे एक माध्यम आहे जे ग्राहक, विविध उद्योजक तसेच संभाव्य सहयोगी संस्था यांना जोडण्याचे काम करते. यामुळे हे परस्परांमध्ये जोडले जाऊन एक समुदाय तयार होईल जो पर्यावरणपूरक आणि टिकाऊ जीवनशैलीला समर्पित असेल.
या प्रदर्शनादरम्यान ब्रूच मेकिंग आणि नॅचरल होली कलर अशा दोन कार्याशाळा आयोजित केल्या जाणार आहेत ज्या सशुल्क असणार आहेत.
“या प्रदर्शनाचा उद्देश हा शाश्वत आणि पर्यावरण पूरक जीवनशैली वर आधारित ब्रँडस एकत्र आणून पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल घडविणे आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यावरण पूरक तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे ग्रीन अंब्रेलाच्या संस्थापिका चैताली गाला यांनी नमूद केले.
