साद सय्यद याला विजेतेपद !!
कोथरूड येथील क्यु स्टीक क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या अंतिम सामना अतिशय उत्कंठावर्धक ठरला. साद सय्यद याने सुरूवातीची फ्रेम ६८-६५ अशा तीन गुणांच्या फरकाने जिंकून चांगली सुरूवात केली. फॉर्ममध्ये असणार्या पुना क्लबच्या सुरज राठी याने दुसर्या फ्रेममध्ये आपल्या गुणवत्तेची चमक दाखवताना ७१-४३ अशा गुणांनी ही फ्रेम जिंकून १-१ अशी बरोबरी निर्माण केली. साद याने अचूक पॉटींग करून तिसर्या फ्रेममध्ये सुरज याला प्रतिकाराची संधीसुद्धा न देता ७२-०० अशी फ्रेम जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. साद याने आपला हाच फॉर्म कायम ठेवत चौथी फ्रेमसुद्धा ६३-१४ अशी जिंकून ३-१ अशी आघाडी घेतली.
सामना वाचवण्यासाठी सुरज याला पाचवी फ्रेम जिंकणे आवश्यक होती. सुरज याने दडपणाखाली उत्तम खेळ करून ५७-४१ अशा १६ गुणांच्या फरकाने पाचवी फ्रेम जिंकून आघाडी २-३ अशी कमी केली. सुरज याने आपला खेळ अधिक उंचावत सहावी फ्रेम ६५-२५ अशी ४० गुणांच्या फरकाने जिंकून सामन्यामध्ये ३-३ अशी बरोबरी निर्माण केली. निर्णायक आणि सातव्या फ्रेममध्ये साद याने मोक्याच्या क्षणी अचूक खेळ करून केवळ ६ गुणांच्या फरकाने ५९-५३ अशी फ्रेम जिंकून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्यु स्टीक क्लबचे संचालक प्रतिक उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक अलेक्स रेगो, लोकेश दिवाने, खेळाडू आदि उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः उपांत्य फेरीः
सुरज राठी वि.वि. अभिजीत रानाडे ३-१ (६३-१५, ४२-६८, ७१-४५, ५०-२५);
साद सय्यद वि.वि. पिनाक अनाप ३-१ (५७-५०, ४३-५२, ७७-१३, ६३-६०);
अंतिम सामनाः
साद सय्यद वि.वि. सुरज राठी ४-३ (६८-६५, ४३-७१, ७२-००, ६३-१४, ४१-५७, २५-६५, ५९-५३).
