एप्रिल महिन्यात कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरात मध्ये
नवी दिल्ली: विविध निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसने गुजरात मध्ये सन २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी भारतीय जनता पक्षाला धूळ चारण्याचा चंग बांधला आहे. देशभरातील नेते कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या गृहराज्यात पराभूत करणे आवश्यक आहे, अशी काँग्रेसची भावना आहे. त्यासाठी पक्षाने दोन वर्षाचा कार्य आराखडा तयार केला असून यावर्षी एप्रिल महिन्यात पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरात मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
गुजरातमध्ये तब्बल तीस वर्षापासून काँग्रेस सत्तेपासून वंचित आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला भर संसदेत मागील वर्षीच आव्हान दिले आहे. ‘तुम्ही लिहून ठेवा, गुजरातच्या निवडणुकीत आम्ही, अर्थात विरोधकांची इंडी आघाडी भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी भाजपला ऐकवले आहे.
गुजरात विजयासाठी काँग्रेसने मिशन 2027 हाती घेतले असून त्याचा कार्य आराखडा आतापासूनच निश्चित करण्यात आला आहे. त्याची सुरुवात एप्रिलमध्ये गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करून करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर दोन वर्षात सातत्याने काँग्रेस राज्यात विविध उपक्रम राबवणार आहे. त्यानिमित्ताने राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची गुजरातमध्ये वर्दळ राहणार आहे. अधिकाधिक मतदार आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील नेते आणि कार्यकर्ते गुजरात मध्ये कामाला लागतील, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले.
