वैविध्यपूर्ण दृष्टिकोन अंगिकारण्याची वेळ – अस्थिरतेवर मात करण्यासाठी लार्ज कॅप आणि अॅसेट अलोकेशन फंडांचा साधावा मेळ
– महेश पाटील, सीआयओ, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड
जागतिक बाजारपेठा अनिश्चिततेच्या काळातून जात असताना गुंतवणूकदारांसमोर अस्थिरतेच्या परिस्थितीत त्यांच्या अतिरिक्त भांडवलाचे नियोजन कसे करावे याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुख्य प्रश्न असे आहेत: गुंतवणुकीसाठी सध्याची वेळ योग्य आहे का? कोणते क्षेत्र किंवा मालमत्ता वर्ग सर्वाधिक आशादायक आहेत? मूलभूत घटक, तांत्रिक प्रवाह आणि तरलता यांच्या आधारावर सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण केल्यास, एक स्पष्ट चित्र समोर येते आणि ते म्हणजे गुंतवणुकीसाठी सावध पण आशावादी दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे.
बाजार मूलभूत घटक
यू.एस. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत “हॉकिश पॉज” घेतला असल्यामुळे जागतिक परिस्थिती गुंतागुंतीची राहिली आहे. 2025 मध्ये संभाव्य दर कपातीमुळे आर्थिक परिस्थितीत शिथिलता येऊ शकते, मात्र मजबूत यू.एस. डॉलरमुळे भारतीय रुपयासह उदयोन्मुख बाजारातील चलनांवर दडपण येत आहे. तथापि, जागतिक टेरिफपासून भारताला तुलनात्मकपणे अधिक असलेल्या संरक्षणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळतो.
देशांतर्गत पातळीवर भारताच्या आर्थिक वाढीला आर्थिक वर्ष 25 च्या सुरुवातीला तात्पुरती मंदी दिसून आली. ही मंदी प्रामुख्याने वित्तीय आकुंचन आणि घटत्या तरलतेमुळे होती. मात्र, वित्तीय आणि आर्थिक धोरणे शिथिल होण्याची अपेक्षा असल्याने परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये GDP वाढ 5.4% नोंदवली गेली, जी आर्थिक वर्ष 26 पर्यंत 6.5% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 25 मधील मध्यम स्वरूपाच्या कॉर्पोरेट नफ्याच्या वाढीला आर्थिक वर्ष 26 मध्ये स्थिर रुपयामुळे गती मिळण्याची शक्यता आहे.
मूल्यांकनाचे मिश्र चित्र दिसून येते. जरी निफ्टीचा फॉरवर्ड P/E त्याच्या 10-वर्षीय सरासरीच्या जवळ असला तरी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभाग अद्यापही प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. निफ्टी कंपन्यांसाठी 15.8% च्या मजबूत ROE मुळे सौम्य मूल्यांकन प्रीमियमला समर्थन मिळत आहे. त्यायोगे भांडवलाचे निवडक वाटप करण्याचा दृष्टिकोन बळकट होतो.
तांत्रिक प्रवाह
निवडणूकनंतरच्या तेजीतील अतिरिक्त वाढ कमी झाल्यानंतर बाजारात लक्षणीय करेक्शन दिसून आले आहे. स्मॉल- आणि मिड-कॅप (SMID) समभागांमध्ये तीव्र घसरण झाली आहे. NSE 500 पैकी जवळपास निम्म्या समभागांनी त्यांच्या उच्चांकावरून 30% किंवा त्याहून अधिक घसरण अनुभवली आहे. हे पुनर्संतुलनाच्या टप्प्याचे संकेत आहेत. 200-दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली व्यवहार करणाऱ्या समभागांचे प्रमाण यासारखे भावनिक निर्देशक बाजार ओव्हरसोल्ड स्तरांकडे जात असल्याचे सुचवते. इतिहास पाहता, हे स्तर बहुतेकदा पुनर्बांधणीची संधी निर्माण करतात.
2022 च्या मध्यानंतर प्रथमच, मालकी भावना निर्देशक ओव्हरसोल्ड झोनमध्ये पोहोचले आहेत. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ते खरेदीची संधी दर्शवतात. अस्थिरता अजूनही चिंतेचा विषय असली तरी, हे निर्देशक जवळच्या कालावधीत व्यापार वाढीची शक्यता आणि सुधारित जोखीम-परतावा परिस्थिती दर्शवतात.
तरलता प्रवाह
FII आऊटफ्लोज उदयोन्मुख बाजारांमध्ये व्यापक राहिला असून तो केवळ भारतापुरता मर्यादित नाही. भारतातील FPI पोझिशन गेल्या दशकातील सर्वात कमी पातळीवर असल्याने, पुढील आऊटफ्लोज शक्यता मर्यादित वाटते. स्थिर यू.एस. डॉलर नव्याने गुंतवणूक ओढून घेण्यास मदत करू शकतो.
देशांतर्गत स्तरावर, SIP प्रवाह स्थिर आहेत, परंतु एकरकमी गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत. उच्च-जोखीम गुंतवणुकींच्या तुलनेत कमी अस्थिरता असलेल्या इक्विटी फंडांची निवड वाढताना दिसत आहे. यातून बाजार संक्रमणाच्या टप्प्यावर असून निवडक आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते हे सूचित होते.
बाजारातील प्रमुख घटना: अर्थसंकल्प आणि आरबीआय धोरणाचा परिणाम
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा वित्तीयदृष्ट्या जरी सावध असला तरीही त्याने 1 लाख कोटी रु. च्या वैयक्तिक प्राप्तीकर लाभांद्वारे महत्त्वपूर्ण उपभोगवाढीला चालना दिली. या बदलामुळे मध्यमवर्गीयांच्या खर्चाला गती मिळेल आणि ग्राहक स्थिर वस्तू आणि ऐच्छिक वस्तू यांसारख्या क्षेत्रांना लाभ होईल. जोडीला वाढीव उत्पन्नामुळे नवीन कर्जवाटप वाढेल आणि ठेवींच्या वाढीस चालना मिळेल. त्याचा फायदा खाजगी बँका आणि वापर केंद्रित वित्तपुरवठादारांना होईल.
दरम्यान, आरबीआयच्या अलिकडील 25 बेसिस पॉइंट दर कपातीने वाढीला पाठिंबा देण्याचा संकेत दिला आहे. 2025 मध्ये आणखी दरकपात अपेक्षित असल्याने तरलता सुधारेल आणि त्यामुळे शेअर बाजाराला अनुकूल पार्श्वभूमी मिळेल.
गुंतवणुकीचा दृष्टिकोन: सावधगिरीने गुंतवणूक करण्याची वेळ
सध्याची अस्थिरता असूनही भारताची दीर्घकालीन आर्थिक परिस्थिती मजबूत आहे आणि बाजारातील बहुतांश करेक्शन पूर्ण झाले आहे. अल्पकालीन जोखीम कायम असली तरी सुधारत चाललेले मोठे आर्थिक परिक्षेत्र आणि धोरणात्मक उपायांमुळे टप्प्याटप्प्याने भांडवल गुंतवण्याची संधी निर्माण होते.
गुंतवणुकीसाठी धोरणात्मक दृष्टिकोन:
मूल्यांकन स्तर तुलनेने अनुकूल असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकदारांनी लार्ज-कॅप आणि फ्लेक्सी-कॅप इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. बँकिंग, वित्तीय सेवा, डिजिटल व्यवसाय आणि ग्राहक-केंद्रित उद्योग ही प्राधान्य क्षेत्रे आहेत. निश्चित उत्पन्नामध्ये, 2025 साठी 8-9% परतावा अपेक्षित असल्याने, सावध गुंतवणूकदारांसाठी हे आकर्षक पर्याय ठरू शकतात. सोन्या-चांदीत 8-12% परताव्याची शक्यता असल्याने, जागतिक अनिश्चिततेपासून संरक्षण म्हणून या मालमत्ता गुंतवणुकीला महत्त्व आहे.
सध्याच्या बाजार स्थितीत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी विविधीकरण ही यशाची गुरुकिल्ली आहे. लार्ज-कॅप इक्विटी सोबत मल्टी-अॅसेट आणि बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडांचा समावेश गुंतवणुकीत करणे फायद्याचे ठरेल. दीर्घकालीन वाढीसाठी पोर्टफोलिओ राखत नजीकच्या काळातील अस्थिरतेत निभावून न्यायला यामुळे मदत होऊ शकेल. बाजारातील घसरण ही आकर्षक मूल्यांकनांवर मालमत्ता जमा करण्याची संधी निर्माण करते, त्यामुळे टप्प्याटप्प्याने आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून भांडवल गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे.
