“आता कॉमेडीचे तुकडे जोडलेले असतात” – ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे
पुणे : पुर्वी कॉमेडी ही नायक आणि नायिकाइतकीच महत्त्वाची होती आता मात्र तुकडे जोडलेले असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी व्यक्त केले.
२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’ देण्यात आले त्यानंतर आज त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे सदस्य समर नखाते यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
आपल्या नर्मविनोदी व खुमासदार शैलीत शुभा खोटे यांनी भारतीय सिनेसृष्टीच्या बदलत्या कार्यशैलीबद्दल सांगितले. हल्लीच्या सिनेनिर्मीतीच्या बाबत बोलताना त्यांनी तत्कालीन निर्मिती प्रक्रियेचा संदर्भ देत आज विविध तंत्रज्ञानामुळे निर्मीती सोपी झाली असल्याचेही सांगितले. सिनेमाच्या बदललेल्या तंत्राबद्दल बोलताना “चित्रपट हे कालानुरूप सतत बदलणारं माध्यम आहे, त्यात जर तुम्हाला टिकून रहायचे असेल तर तुम्हालाही त्या बदलांच्या सोबत चालावे लागेल.” असे प्रतिपादन शुभा खोटे यांनी केले.
भारतीय सिनेमाच्या सुवर्ण कालखंडाबद्दल बोलताना त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल सिनेमा पासून थ्रीडी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार होणारा सिनेमा या दीर्घ स्थित्यंतर पर्वाच्या त्या साक्षीदार आहेत. आपल्या या प्रवासातील विविध आठवणी व किस्से याप्रसंगी त्यांनी सांगितले. आपले सहकलाकार राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, मेहमूद, बलराज सहानी, शम्मी कपूर, नूतन, तनुजा, ललिता पवार, मधुबाला यांच्या विविध आठवणींचा खजिना त्यांनी उलगडून दाखवला. त्यानंतरचे नव्या फळीतील सुपरस्टार्स शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सांगताना त्यांचे कौतुक शोभा खोटे यांनी केले. त्या म्हणाल्या, “मला समाधान आहे की मी उत्कृष्ट आणि महान लोकांबरोबर काम केले.”
आपले बालपण, वडील व नाटककार नंदू खोटे यांचेकडून मिळालेले प्राथमिक नाट्यसंस्कार, चित्रपट सृष्टीतील पहिले पाऊल ते सध्याच्या बॉलिवूड सिनेमाबद्दल त्या भरभरून बोलल्या. आपला पहिला सिनेमा “सीमा” व दिग्दर्शक अमीया चक्रवर्ती यांच्या विविध आठवणीही त्यांनी सांगितल्या.
परिषदेचा समारोप करताना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून मिळालेला पुरस्कार त्यांच्यासाठी खूप विशेष असल्याचे शुभा खोटे म्हणाल्या. जब्बार पटेल यांनी देखील अनेक आठवणी व किस्से उपस्थितांना सांगितले.
