चित्र आणि पत्रातून मुलांनी रेखाटली कल्पनेतील प्रदूषणमुक्त राम नदी
पुणेः- मानवी संस्कृती ही नदीच्या किनारी वसली, विकसीत झाली आणि उत्कांत झाली. परंतू, तीच नदी आज मरणासन्न अवस्थेत असून आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला प्रदुषणमुक्त राम नदी पहायला मिळेल का, असा जिकीरीचा प्रश्न विचारत राम नदी परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतील प्रदुषणमुक्त राम नदीचे चित्र रेखाटले…. निमित्त होते प्रदुषणाचा विळखा बसलेल्या राम नदीचे पुनरूज्जीवन व्हावे यासाठी राम नदीच्या काठावरील २५ शाळांमध्ये वर्षभर केलेल्या अनेकविध उपक्रमांचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाचे!
संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर के.पी.सी.एल. बी.एस.एस. हेल्थ अँड सीएसआरचे जनरल मॅनेजर डॉ. सुरेश मिजार, एसएलके फौंडेशनचे सीईओ हरेंद्र गोडांबे, किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव, स्वच्छ वसुंधरा अभियानाचे अनिल गायकवाड, संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा नागूलपेल्ली आणि हेमलता अकोलकर आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश मिजार म्हणाले की, राम नदी पुनरूज्जीवन उपक्रमाची व्याप्ती आता वाढली असून किर्लोस्कर उद्योग समुहाच्या विविध आस्थापनांमधील कर्मचारी तसेच राम नदीच्या किनारी वसलेल्या शाळा आणि महाविद्यालयांधील विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी या सगळ्यांचा या उपक्रमातील सक्रीय सहभाग वाढला आहे. या उपक्रमामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना देखील सामावून घेणे आवश्यक आहे. कारण पालकांच्या भूमिकेत असलेल्या पिढीपासूनच नद्यांच्या प्रदूषणास प्रारंभ झाला असून नद्यांप्रती त्यांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी त्यांच्यात देखील जागृकता आणणे आवश्यक आहे. मोठ्यांमध्ये लपलेल्या लहान बालकांना साद घालून पालक आणि मुले यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच हे अभियान यशस्वी होणार आहे.
यावेळी बोलताना वीरेंद्र चित्राव म्हणाले की, अशा उपक्रमाच्या माध्यमातून घराघरात विद्यार्थ्यांच्या रूपाने स्वच्छतादूत निर्माण करण्यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली आहे. या प्रकल्पास प्रारंभ झाला, त्यावेळी रामनदी नक्की कुठे आहे आणि आपण रामनदीच्या काठावर राहतो, हेदेखील पुणेकरांना माहिती नव्हते. गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राम नदीविषयी जागरूकता वाढत असून आमच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. रामनदी केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंधरा शिक्षकांची निवड समिती तयार करून स्पर्धेतील विजेते निवडणे आमच्यासाठी आव्हान होते. या उपक्रमाच्या माध्यमातून रामनदी संरक्षणाचा संदेश आम्ही अनेक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवू शकलो, याचे आम्हाला समाधान आहे. दुर्लक्षित असलेल्या रामनदीचे पुनरूज्जीवन व्हावे, तिचा प्रवाह अविरल आणि निर्मल व्हावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांना नदी व पर्यावरण रक्षणासाठी प्रवृत्त करावे या उद्देश्याने ‘किर्लोस्कर वसुंधरा रामनदी अभियाना’ने नदीच्या काठावरील २५ शाळा दत्तक घेतल्या आहेत. सुमारे १.५ लाख शालेय विद्यार्थ्यांना नदी पुनरुज्जीवनास जोडण्याचा उपक्रम सुरु आहे. मुलांना राम नदीची ओळख करुन देणे, त्यांची विविध उपक्रमांद्वारे राम नदी विषयी आस्था निर्माण करणे व त्यांच्या माध्यमातून कुटूंबियांना देखील राम नदी पुनरुज्जीवन अभियानास सहभागी करुन घेणे हा आमचा उद्देश आहे. दृक्श्राव्य व्याख्याने, कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा, राम नदीस पत्र, कचऱ्यातून कला, चित्रकला स्पर्धा अशा अनेकविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
यावेळी बोलताना अनिल गायकवाड म्हणाले की, 2020 मध्ये रामनदी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी राम नदीमध्ये या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांचा राडारोडा, प्लास्टीक कचरा, परिसरातील हॉटेल चालकांकडचा ओला आणि सुका कचरा अशी सगळ्याच स्तरांवरची अस्वच्छता होती. त्या सर्व घटकांचे प्रबोधन करून वेळप्रसंगी यंत्रणेमार्फत शासन करून राम नदी पुनरूज्जीवनाच्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत.
यावेळी संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता अकोलकर यांनी या प्रकल्पात शाळेला सामावून घेतल्याबद्दल किर्लोस्कर उद्योग समुह आणि राम नदीचे पुनरूज्जीवन समितीचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास कदम यांनी केले.
