धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंड मध्ये विरोध
सह्यांच्या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मुंबई, : धारावीकरांच्या पुनर्वसनाला मुलुंड मध्ये विरोध करण्यात आला असून त्याविरोधात मुलुंडमध्ये नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. सत्ताधा-यांनी मुलुंडकरांची फसवणुक केली असून एक इंचही जागा धारावीकरांना देणार नाही, असे आश्वासन सत्ताधा-यांनी मुलुंडकरांना दिले होते. मात्र सत्तेवर येताच धारावीकरांचे पुनर्वसन करण्यासाठी मुलुंड मधील ५८ एकर जागा अदानी कंपनीला देण्यात आली. याविरोधात मोर्चा नुकताच मोर्चा काढण्यात आला होता आणि आता मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ शिवसेनेच्यावतिने सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याला मुलुंडकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन मुलुंडकरांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. मोर्चे, आंदोलन, उपोषण या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वीच मुलुंड मध्ये शिवसेनेच्यावतिने मोर्चा काढण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मुलुंड मधील नागरिकांनी दिला. राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेच्यावतिने मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कामावरुन येणा-या मुलुंडकरांनी घरी जाण्यापुर्वी सह्या करुनच आपले घर गाठले. येणा-या पुढील काळात हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल अशी माहिती या आंदोलनाचे प्रमुख अँड. सागर देवरे यांनी दिली. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीमध्येच करण्यात यावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून मुलुंडकरांच्या पाठीशी असल्याचे ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले.
धारावीकरांचे मुलुंड मध्ये पुनर्वसन करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. धारावीतील नागरिकांना आहे त्याच ठिकाणी घरे देण्यात यावे, आशिया खंडात धारावी झोपडपट्टी ही सर्वात मोठी असून कोट्यावधी रुपयांचा लघुउद्योग या ठिकाणाहून चालतो. धारावीकराचे पुनर्वसन इतरत्र केल्यास हा कोट्यावधी रुपयांचा लघुउद्योग बंद होऊ शकतो. त्यामुळे हजारो लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे म्हणुन धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत करण्यात यावे, मुलुंडकरांच्या सोबत आम्ही आहोत.
राजोल संजय पाटील, युवासेना कार्यकारणी सदस्य
