स्वामी विवेकानंदांना घोषवादनातून विद्यार्थ्यांनी केले अभिवादन
पुणे : भारताच्या युवा शक्तीचे प्रतीक असलेल्या स्वामी विवेकानंद यांना विद्यार्थीनींनी घोष वादनातून अभिवादन केले. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका असा संदेश देणारे विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत वंदन करण्यात आले. घोषवाद्यांवरील देशभक्तीपर गीतांच्या वादनाने आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स.प.महाविद्यालय चौकात डी.ई.एस. प्रशाला, रेणूका स्वरुप प्रशाला, नूमवि मुलींच्या प्रशालेतील विद्यार्थीनींनी घोषवादन करुन स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष संध्या भिडे, संजय कंदलगाकर, अनंत दळवी आदी उपस्थित होते.
डॉ. सतिश देसाई म्हणाले, तरुणांनी गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरु नका. अतिमोबाईल वापरामुळे तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे आपली बुद्धी काम करत नाही. चॅट जीपीटी आणि एआय मुळे लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे डोक्याने काम करणे बंद होत आहे. तरुणांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नका, गरजेपुरता मोबाईलचा वापर करा. सर्जनशिलता निर्माण करायची असेल तर स्वतःच्या डोक्याचा वापर करायला शिका.
ते पुढे म्हणाले, तरुण पिढीसमोर स्वामी विवेकानंद यांचा आदर्श आहे. उठा, जागे व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी दिला. समाज बदलण्यासाठी तरुण पिढी कार्य करु शकते. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि समाजासाठी चांगले काहीतरी करण्याचा संकल्प करा.
सूर्यकांत पाठक म्हणाले, सन १९७४ ला ग्राहक पंचायत सुरु झाली. स्वामी विवेकानंदांना आदर्श मानून पंचायतीचे कार्य सुरु झाले. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम ग्राहक पंचायतीच्या शाखांमध्ये देशभर साजरा केला जातो, असेही त्यांनी सांगितले. सुधीर पाचपोर यांनी गीतगायन केले.
