पूर्वजांनी दिलेल्या संघर्षाचा वारसा घेऊन प्रगतीची कास धरूया – छगन भुजबळ
पुणेः- संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला संघर्षाचा वारसा दिला असून त्या वारश्याला स्मरून आपण प्रगतीची कास धरली पाहिजे, असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दरवर्षी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ आज प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी भुजबळ बोलत होते. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समता भूमी, फुले वाडा येथे झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव तसेच आमदार हेमंत रासने, पंकज भुजबळ, योगेश टिळेकर, समीर भुजबळ, रूपाली चाकणकर, शब्बीर अन्सारी, दिलीप कांबळे, अड. मंगेश ससाणे, मनीषा लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. उगाचच शिविगाळ करून घर जाळून एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. आपल्याला एकजुटीने उभे राहावे लागेल. आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढाईसाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरावे लागले.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना नागराज मंजुळे म्हणाले की, पुरस्कारामुळे आनंद आणि कृतज्ञता अशा समिश्र भावनांचा कल्लोळ माझ्या मनात दाटला आहे. माझ्या वयाच्या ज्या टप्यावर मला महात्मा फुले या महात्म्याची विविध मार्गांनी ओळख झाली त्यामुळेच मी आता सन्मार्गावर आहे. अन्यथा माझा समाज आणि कुटुंबिय देखिल अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेले होते . वडिलांशी वैचारीक, तार्किक आणि तात्विक भांडण करून मी बाबासाहेबांचा फोटो घरात लावला. आपल्या जुनुकीय वडीलां बरोबरच महात्मा फुले – आंबेडकर आणि शाहू महाराज आपले वैचारिक बाप आहेत. त्यांचे ऋण आपण मानलेच पाहिजे. म. फुलेंचे साहित्य मी वाचले म्हणून मला दुष्टीकोन मिळाला. संविधाना सोबतच आपण साऱ्यांनी महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे वाचन केले पाहिजे. जाती जातीमधील संकुचितता संपवून आपल्या वैचारिक बापांच्या ऋणात राहिले पाहिजे. यावेळी रूपाली चाकणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी केले. तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.
