Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

कलानिधी आयोजित मैफलीत भुवनेश कोमकली, ऋतुजा लाड यांचे सुमधूर गायन

पुणे : प्रसिद्ध गायक पंडित भुवनेश कोमकली यांनी आपल्या गायनसेवेतून पंडित कुमार गंधर्व आणि विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या सांगीतिक अनुबंधाचे पैलू उलगडत आपल्या दमदार गायनाने रसिक श्रोत्यांना अनोखी स्वरानुभूती दिली. तर विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्काराने सन्मानित झालेल्या ऋतुजा लाड यांनी आपल्या सुमधूर स्वरांनी रसिकांची वाहवा मिळविली.


कलानिधी संस्थेतर्फे विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्काराने जयपूर-अत्रौली घराण्याच्या युवा गायिका ऋतुजा लाड यांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, प्रसिद्ध तबलावादक भरत कामत, विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांचे पती डॉ. हरी सहस्त्रबुद्धे, कलानिधी संस्थेचे संस्थापक, प्रसिद्ध गायिका अपर्णा गुरव, प्रसिद्ध तबलावादक मिलिंद गुरव स्वरमंचावर उपस्थित होते.


ऋतुजा लाड यांनी मैफलीची सुरुवात राग श्रीमधील विलंबित तीन तालातील ‌‘कहा मै गुरू ढूंढन जाऊ‌’ या बंदिशीने केली. त्यानंतर गुरू अश्विनी भिडे-देशपांडे रचित श्री रागातील मध्यलयीतील ‌‘ॐकार नादमयी तुम हो‌’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. पंडित बळवंतराय भट्ट यांनी रचलेला आडाचौताल सादर करून तराण्याची झलक दाखविली तर अनिता सिंग यांनी रचलेल्या ‌‘बैरी बदरा काहे सताए‌’ या अविट गोडीच्या कजरीने ऋतुजा यांनी मैफलीची सांगता केली. प्रणव गुरव (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी), आनंदिता आंबेकर, उमंग निकम (तानपुरा-सहगायन) यांनी साथसंगत केली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना ऋतुजा लाड म्हणाल्या, कलाकार घडण्यासाठी समाजातील अनेक घटकांची आवश्यकता असते. हा पुरस्कार उपकृत भावनेने त्या प्रत्येक घटकाला समर्पित करू इच्छिते. विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार माझ्या सांगीतिक जीवनाला प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. युवा कलाकारांना वीणाताईंचे सांगीतिक कार्य त्यांनी घडविलेल्या शिष्यांच्या माध्यमातून मार्गदर्शक ठरेल. त्या गुरू, संशोधक आणि कलाकार म्हणून खूप महान होत्या.

कलानिधीतर्फे विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कार आयोजित केला जातो हे कार्य कौतुकास्पद आहे, असे सांगून प्राचार्य पंडित प्रमोद मराठे म्हणाले, संस्थेचा हा उपक्रम सातत्याने सुरू रहावा आणि उत्तमोत्तम युवा कलाकारांना गौरविले जावे. कलाकार घडण्यात मदतनीस ठरलेल्या प्रत्येक घटकाचे ऋतुजा लाड यांनी ऋण व्यक्त केले ही बाब अभिनंदनीय आहे. भरत कामत म्हणाले, वीणा ताईंचा अनेक वर्षे सहवास लाभला. त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित भुवनेश कोमकली यांनी राग कल्याणमधील ‌‘बनू रे बलैय्या‌’ या बंदिशीने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. ‌‘अवगुन न किजिए गुनीसत‌’ हा ख्याल सादर केला तेव्हा पंडित भुवनेश कोमकली यांच्या गायनातून त्यांचे आजोबा सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीची झलक जाणवली. पंडित कुमार गंधर्व रचित ‌‘पिहरवा तुम‌’ हा ख्याल त्यांनी दमदारपणे सादर केला. राग मिश्रकाफीमधील कुमारजींचीच ‌‘कैसे भरु पानी‌’ ही ठुमरी ऐकताना बुजुर्ग-जाणकार रसिक श्रोते कुमारजींच्या गायनशैलीच्या आठवणींमध्ये रममाण झाले. भुवनेश कोमकली यांनी मैफलीची सांगता ‌‘तना दिन तना दे रे ना‌’ या कुमारजींच्याच ठुमरीने केली. दमदार आवाज, बहारदार ताना, उत्तम सादरीकरण याद्वारे भुवनेश कोमकली यांनी कुमारजींचा सांगीतिक वारसा जपताना स्वत:ची स्वतंत्र गायनशैली निर्माण केल्याचे रसिकांना जाणवले. प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), परिश्रीता बन्सेवाल (तानपुरा-सहगायन), अमेय फाटक (तानपुरा) यांनी साथ केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading