Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

वारकरी संप्रदाय घराघरात रुजावा – हभप. डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर यांचे विचार

 

पुणे : वारकरी संप्रदाय पोट भरण्यासाठी नसून आध्यात्मिक उन्नती, सुख, शांती आणि समाधानासाठी आहे. हा संप्रदाय घराघरात रुजविण्यासाठी प्रशिक्षित, ध्येयनिष्ठ व आदर्श वारकर्‍यांची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांच्या मनात वारकरी संप्रदायाचे बीज रूजवावे. जेणे करून या वारीत वृद्धांपेक्षा युवक पांडुरंगाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दिसायला हवा. असे विचार ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माइर्स एमआईटी, पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीच्या लोकशिक्षणपर अभिनव उपक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, उषा विश्वनाथ कराड, श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड चाटे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, गिरीश दाते, डॉ. टी.एन.मोरे व ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर उपस्थित होते.
ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर म्हणाले, वारकर्‍यांमध्ये संख्यात्मक नको तर गुणात्मकतेने वाढ व्हावी. वर्तमानकाळात लहान मुलांना संस्कार देण्यासाठी संप्रदायाचे शिक्षण देणारी शिक्षण व्यवस्था हवी आहे. नवी पिढी मोबाइल व्यसनाधिन झाली असून त्यांना या पासून परावृत्त करावे. निष्ठावान वारकरी बनून संसाराची आसक्ती कमी करावी. तसेच मोक्ष प्राप्तीसाठी ध्येय साध्य करावे.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, भक्तीच्या वाटेवर चालतांना मी पणा सोडून दयावा लागतो. कर्मयोग अत्यंत महत्वाचा असून सतत शिकत रहावे. कर्माबरोबर आचरणातून आपला व्यवहार दिसावा. महाभारताचा अभ्यास केल्यावर जाणवते की मना विरूद्ध सतत गोष्टी घडत असतात. त्यासाठी विरोधाभास गरजेचा असतो. अशा वेळेस दृढ निश्चयाने व सद् सद् विवेक बुद्धीने कार्य करत रहावे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वै. बाबामहाराज सातारकर यांच्या सुकन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालिकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. हभप महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading