अमली पदार्थांचा समूळ नायनाट होईपर्यंत बुलडोझर चालतच राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: केवळ मुंबई, पुणे, ठाण्यातच नव्हे तर जिथे जिथे अवैध व्यापार सुरू आहे तिथे तिथे अमली पदार्थांचा समूळ नायनाट होईपर्यंत बुलडोझर चालतच राहणार, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. राज्यभरात पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावर तरुणाईला नासवणाऱ्या अमली पदार्थांची पाळीमुळे खणून काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पुण्यातील एका पबमध्ये अल्पवयीन मुले अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा प्रकार उघडकीला आला. त्यानंतर ज्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री केली जाते, साठा केला जातो अशा ठिकाणांवर कारवाई करून बुलडोझर द्वारे ती निस्तनाभूत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार केवळ पुण्यातच नव्हे तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणीही अमली पदार्थांच्या विरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची व्याप्ती वाढवून ती राज्यभर राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
कोणी कितीही मोठा असला तरी…
अमली पदार्थांची विक्री करणारा, साठवणूक करणारा, मोठा पुरवठादार, असा कोणी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. सरकार उघड्या डोळ्याने तरुण पिढी बरबाद होताना पाहू शकत नाही. जोपर्यंत शहर आणि संपूर्ण राज्य अमली पदार्थमुक्त होत नाही, तोपर्यंत बुलडोजर फिरतच राहणार, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
इंद्रायणी प्रदूषणमुक्त करणार
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे. मी स्वतः पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.मला तिथे पाचारण करण्यात आले आहे. त्यावेळी इंद्रायणी नदीची पाहणी करून जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले.
खड्ड्यातून पांढरा पैसा करणाऱ्यावरही बुलडोझर
मुंबई शहरांत अनेकांनी खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली पैसा पांढरा करण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर केले आहेत. त्यांच्यावरही बुलडोझर चालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका सध्या प्रशासकांच्या अख्त्यारीत असली तरी महापालिकेवर दीर्घाकाल शिवसेनेची सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकाही होणार आहेत. त्या अनुषंगाने शिंदे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करून शिवसेना ठाकरे गटाला निस्तनाबूत करण्याचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे.
