Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खिशात 70 रुपये असतील तर शंभर रुपये खर्च कसे करणार – शरद पवार

मुंबई: राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलवलेला शब्दांचा फुलोरा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली. खिशात 70 रुपये असतील तर शंभर रुपये खर्च कसे करणार, या प्रश्नाचे उत्तर अर्थसंकल्पात नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

सरकारकडे महसुली जमा किती आहे, महसुली खर्च किती होणार आहे, जमा आणि खर्च यामधील अंतर कसे भरून काढणार आहे, याबद्दल या अर्थसंकल्पात कोणतीही स्पष्टता नाही. या बाबी स्पष्ट न करता, आम्ही हे करू आणि ते करू, या सांगण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे जनता देखील या अर्थसंकल्पावर विश्वास ठेवणार नाहीत, असे पवार म्हणाले. 

अंमलबजावणीबाबत साशंकता 

राज्यातील महसुली जमा, तूट आणि योजना अमलात आणण्यासाठी असलेली निधीची आकडेवारी पाहता या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी अगदीच तोकड्या आहेत. त्याचप्रमाणे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करता हा अर्थसंकल्प म्हणजे ज्या गोष्टी घडणार नाहीत त्या घडविण्याचा दावा करीत केवळ मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा केलेला प्रयत्न आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. 

सामूहिक नेतृत्व हाच महाविकास आघाडीचा चेहरा 

बिन चेहऱ्याची निवडणूक लढवणे अवघड आहे, असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित करावे, अशी मागणी नुकतीच केली आहे. आपल्या पक्षाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये ठाकरे यांच्याकडे बघून मिळालेल्या मतांचे प्रमाण उल्लेखनीय आहे, असे सांगत राऊत यांनी आडपडद्याने ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करावे, असेही राऊत यांनी सुचित केले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार यांनी राऊत यांच्या मागणीला बगल दिली. कोणत्याही व्यक्तीबाबत आमचा निर्णय झालेला नाही. आमची आघाडी आहे. सामूहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र आहे, असे स्पष्ट करतानाच पवार यांनी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होणार नसल्याचे सुचित केले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading