Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

नानासाहेब पेशवे यांचे कार्य देशभरात पोहोचविण्यास आपण कमी पडलो – मोहन शेटे

पुणे :  श्रीमंत नानासाहेब पेशवे  यांच्याकडे १७४० साली देशाचे नेतृत्व आले. भारताला अत्यंत कुशल प्रशासक नानासाहेबांच्या रूपाने मिळाले. मराठ्यांचे सामर्थ्य नानासाहेबांच्या काळात वाढले. परंतु दुर्दैवाने त्यांचे जे कर्तृत्व होते ते संपूर्ण भारतात पोहोचवायला आपण कमी पडलो.  त्यांचे उचित स्मारक देखील झाले नाही. अशी खंत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केली.

श्री देवदेवेश्वर संस्थान, पर्वती व कोथरूड पुणे यांच्या वतीने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या २६३ व्या पुण्यतिथीनिमित्त मोहन शेटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सारसबाग गणपती मंदिर प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत व पुष्कर पेशवे, पालखेड स्मारक समितीचे प्रशांत गोऱ्हे, हेमंत तांबोलकर, विद्या घटवाई तसेच किशोर एनपुरे उपस्थित होते. 

मोहन शेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ज्याप्रमाणे साजरा केला जातो, त्याचप्रमाणे अटक विजय दिन देखील साजरा करायला पाहिजे. कुशल प्रशासक तर ते होतेच त्यासोबत अनेक मोहिमा देखील त्यांनी केल्या आहेत.  देशात कुठेही असले तरी राज्यावर त्यांची नजर घारीसारखी होती. त्यांच्या कारकिर्दीत पुणे हे देशाच्या केंद्रस्थानी होते. पुण्यातील पेठा त्यांनी वसविल्या. व्यापारांनी पुण्यात येऊन व्यापार करावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या काळात कलाशैलींचा विकास पुण्यात झाला.

जगन्नाथ लडकत म्हणाले, नानासाहेब पेशवे यांचे कार्य अतिशय दैदिप्यमान आहे. त्यांच्या कार्याची माहिती लोकांना कळावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात येते. नानासाहेब पेशवे यांच्या तिथीप्रमाणे असलेल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील पर्वतीवर करण्यात आले. स्वागत व आभार रमेश भागवत यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading