योग आपल्यातील उपद्रव मूल्य कमी करतो – डॉ. गिरीश कुलकर्णी
विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
पुणे, २२: उपद्रव मूल्य जास्त असलेले लोक आपले हिरो बनलेले आहेत. त्यामुळे आपल्या समाजाचे खुप मोठे नुकसान होत आहे. हे जर कमी करायचे असेल तर व्यक्तींमधील सृजन मूल्य वाढवणे गरजेचे आहे. योगमुळे सृजन मूल्य वाढून उपद्रव मूल्य कमी होते आणि त्यामुळे हिंसक होत चाललेला आपला समाज अधिक संवेदनशील होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजकुमार राठी पतंजली योग चेअर यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी, आंतरराष्ट्रीय योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद, योग तज्ञ डॉ. गिरीश वेलणकर, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, राठी समूहाचे संचालक श्री. राहुल राठी, क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विष्णू पेठकर, आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभय कुदळे, भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीश सांगोडे, सेंटर फॉर पब्लिकेशन इथिक्सच्या प्रमुख डॉ. शुभदा नगरकर, आदी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना, तंत्रज्ञानामुळे अनुभवाला महत्त्वच राहिलेले नाही. कारण सध्या कुठल्याही गोष्टीचा अनुभव मिळण्याआधीच त्या गोष्टीची आपल्याला माहिती मिळत आहे. या अनुभवहीन जगण्यामुळे आपण पोकळ होत चाललो आहे. मात्र योगच्या बाबतीत तसे होत नाही. योग अनुभूती देतं आणि त्याशिवाय ते कळतच नाही, असे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले. तर योग आपल्याला स्वतःच्या आत बघायला शिकवतो. त्यामुळे जर व्यक्ती म्हणून आपण चांगले घडलो तर समाज म्हणूनही आपण चांगलेच घडू, असेही ते म्हणाले. बाहेरच्या जगात वावरताना मनाची शांतता, स्थिरता महत्त्वाची आहे आणि ती जर मिळवायची असेल तर आपल्याला योग साधना नाही, तर योग दर्शन करावे लागेल. जे आत आहे त्याचे दर्शन करावे लागेल. कारण त्याने माणूस आत्मिक तृप्त होतो, त्याच्यातील मीपणा कमी होतो. आणि असाच व्यक्ती दुसऱ्यांची निस्वार्थ भावनेने मदत करू शकतो आणि चांगला समाज घडवू शकतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी यावेळी केले. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये योगचा समावेश असायला हवा. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानग्रहण करण्याची प्रक्रिया गतिमान होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात गुणात्मक परिवर्तन होते, असे मत योग तज्ञ डॉ. गिरीश वेलणकर यांनी व्यक्त केले. तसेच सध्याच्या वर्क कल्चरमुळे अनेक तरुण तणावात जगत आहे. ते व्यसनाधिनतेकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे जर हे वर्क कल्चर बदलायचे असेल तर तिथेही योगचा अंतर्भाव कसा करता येईल, यावर विचार करणे आवश्यक आहे, असेही डॉ. वेलणकर म्हणाले. याप्रसंगी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील योग शिक्षिका श्रीमती. पुष्पाताई मांडगे यांच्या सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थितांसमोर ‘फ्लो योग’ सादर केला. तसेच उपस्थित सर्वांनी ‘चेअर योग’ही केला.
