Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अजित पवार शब्द पाळणार का? परभणी जिल्ह्याचे विधानपरिषद निवडणुकीकडे लक्ष

परभणी  : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अंतिम क्षणी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांना ‘निश्‍चितपणे आमदार करु’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतील जाहीर सभेतून जाहीर केले खरे, परंतु तो शब्द ते पाळणार का? याकडे या जिल्ह्यातील राजकीय वर्तूळासह जिल्हा वासीयांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीत विटेकर यांचा अवघ्या चाळीस-बेचाळीस हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. विटेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास त्याचे चांगलेच शल्य बोचले. त्यामुळेच 2024 च्या निवडणूकीतून त्या पराभवाची परतफेड करु, असा विश्‍वास बाळगून विटेकर यांच्यासह राष्ट्रवादीने नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली. विशेषतः पूर्णतः बदललेल्या विलक्षण अशा राजकीय पार्श्‍वभूमीवर विटेकर यांनी नवे मित्र, नवीन राजकीय समीकरणे अन् नवीन वोट बँकेबरोबर नातं जूळविण्याकरीता प्रयत्न सुरु केले. त्यांच्याशिवाय महायुतीकडेसुध्दा महाविकास आघाडीस लोळविण्याकरीता अन्य कोणताही सर्वार्थाने सक्षम पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसह शिवसेनेने राष्ट्रवादीबरोबर खांद्यास खांदा लावून किल्ला लढविण्याचा संकल्प सोडला होता. दुर्देवाने राज्य पातळीवरील समीकरणे विशेषतः बारामतीतील मोर्चेबांधणी डोळ्यासमोर ठेवून महायुतीने विटेकर यांना थांबण्याचा सल्ला देवून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना अंतीम क्षणी परभणीत रवाना केले.

महायुतीच्या श्रेष्ठींचा तो निर्णय स्थानिक पातळीवरील नेतेमंडळींसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चक्रावून सोडणाराच ठरला. परंतु, मनावर बिंबलेल्या ‘अब की बार चारसों पार’च्या नार्‍या पोटी मोदी भक्तांनी तो निर्णयसुध्दा पचवला अन् डोळे झाकून शिट्टी फुंकली. तरीसुध्दा जानकर यांचा मोठा पराभव झाला. त्या पराभवाचे आता कारणमिमांसा सुरु झाली खरी, परंतु त्यातून जानकर ऐवजी विटेकर यांना रिंगणात उतरवले असते तर जागा निघाली असती असाही एक निष्कर्ष समोर आल्यानंतर महायुतीच्या स्थानिक नेतेमंडळीबरोबर श्रेष्ठींनीसुध्दा आळीमिळी गुपचिळीचे धोरण स्विकारले. त्यामुळे विटेकर यांच्यासह समर्थक ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी स्थिती अनुभवू लागले. त्यास लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर खुद्द श्रेष्ठींनी म्हणजेच अजित दादा यांनी परभणीच्या जाहीर सभेतून राजेशला विधीमंडळावर घेवू असा दिलेला शब्द कारणीभूत ठरला. त्या शब्दापोटीच विटेकर व त्यांचे समर्थक मोठ्या आशेने अन् अपेक्षेने मुंबई-दिल्लीतील प्रत्येक राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून बसले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading