Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवात सतार निर्माते हाजी अहमद सो आबासो यांचा विशेष सन्मान

 

पुणे  : सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद रहिमत खाँ साहेब, उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब, उस्ताद बाले खाँ साहेब यासोबतच त्यांच्या पुढील पिढीतील कलाकरांबरोबरच उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गंगुबाई हनगल, पंडित बसवराज राजगुरु यांसारख्या कलाकरांसाठी १९४० पासून सतार या वाद्याची निर्मिती करणारे मिरज येथील ९९ वर्षांचे सुप्रसिद्ध सतार निर्माते हाजी अहमद सो आबासो यांचा ६ व्या सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवात विशेष सम्मान करण्यात आला. याबरोबरच तालवाद्य कलाकार माऊली टाकळकर यांचाही सन्मान करण्यात आला.

पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ व्या सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवात मिरज राजघराण्याच्या गायत्रीदेवी पटवर्धन यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले.

कन्नड संघाच्या, उपाध्यक्षा इंदिरा सालियान, सचिव मालती कलमाडी, सुप्रसिद्ध सतारवादक छोटे रहिमत खाँ, सुहाना बसंत फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध सतारवादक रईस खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सदर महोत्सव संपन्न झाला.

सतार नवाज उस्ताद बाले खान यांचे घराणे ‘सताररत्न’ या पदवीने ओळखले जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात या घराण्याचा मोठा वाटा असून सतार नवाज उस्ताद बाले खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक रईस खान दरवर्षी पुण्यात या महोत्सवाचे आयोजन करतात. सदर महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यावर्षी महोत्सवात सतार निर्माते हाजी अहमद सो आबासो आणि पुण्यातील ज्येष्ठ तालवाद्य कलाकार माऊली टाकळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप होते.

महोत्सवाची सुरुवात पाच उस्ताद खान बंधूंच्या ‘सतार पंचक’ या सादरीकरणाने झाली. यावेळी उस्ताद छोटे रहिमत खान, रफिक, शफिक, रईस, आणि मोहसीन या खान बंधूंनी प्रस्तुतीकरण केले.

यावेळी बोलताना उस्ताद छोटे रहिमत खान म्हणाले की, ‘सतार पंचक’ या संकल्पनेला माझ्या भावाने १९९५ साली सुरुवात केली. याचे देशभरात अनेक प्रयोग झाले आणि रसिकांना ते आवडले देखील. आज हीच संकल्पना आम्ही पुणेकरांसमोर घेऊन येत आहोत.

‘सतार पंचक’ या संकल्पनेअंतर्गत राग पुरिया कल्याण प्रस्तुत करीत पाचही खान बंधूंनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. आलाप जोड यांची बहारदार प्रस्तुती त्यांनी केली. यानंतर त्यांनी चौताल आणि तीन तालमध्ये काही रचना पेश केल्या. पं. राजेंद्र नाकोड यांनी तबलासाथ केली.

पहिल्या दिवसाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन रंगले. त्यांनी यावेळी राग छायानट प्रस्तुत केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शिवराज पाटील, कैवल्य पाटील (तानपुरा) यांनी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading