Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

पुणे जिल्ह्यात पालखी तयारी अंतिम टप्प्यात

पुणे : श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ च्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखी तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी ३ हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ८००, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार २०० आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५० शौचालयांची सुविधा करण्यात येणार आहे.

आषाढी वारीसाठी २०० पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. ११५ आरोग्य पथके, ५७ फिरते वैद्यकीय पथक आणि १७९ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे. १२ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल.

अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल टॉवरची नेटवर्क फ्रिक्वेंसी वाढविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील नियोजन
अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. दत्त घाटाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. लोणंद पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. येथे २५ फिरते आरोग्यदूत आणि ८ आरोग्य पथके असतील.

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियोजनाबाबत व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील नियोजन
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शन बारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली व लिंबू पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्यादृष्टीने सर्व नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading