Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

आकारापेक्षा कोणत्याही चित्राची चौकट महत्त्वाची – मिलिंद मुळीक 

पुणे : चित्र किती लहान आहेत, किती मोठी आहेत हा भाग चित्रामध्ये महत्त्वाचा नसतो तर या आकारापेक्षा चित्राची चौकट कशा पद्धतीने भरली आहे हे जास्त महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रकार मिलिंद मुळीक यांनी केले. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कला दालनात आयोजित युवा चित्रकार विवेक दहिवले यांच्या ‘ग्रीष्म’ या एकल चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुळीक यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी, स्नेहल प्रकाशनचे संस्थापक रवींद्र घाटपांडे, चित्रकार सज्जला कुलकर्णी,  संजीव व प्रियंवदा पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
येत्या रविवार दि १६ जून पर्यंत घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, “रंगांचे वैविध्य, चित्र चौकटीतील रचना, कौशल्य आणि साधेपणातील सौंदर्य, यामुळे चित्रकार विवेक दहिवले यांची चित्रे नजर खिळवून ठेवतात. विवेक यांनी चितारलेली चित्रे लहान आकारातील असली तरी, या चित्रांमध्ये नजर खिळवून ठेवण्याची क्षमता आहे. चित्रकाराची परिपक्वता या चित्रांमधून जाणवते. विवेक यांच्या चित्रांची मांडणी आणि रंग संगती ही नेमकी, प्रभावी व परिपक्व आहे हे आपल्याला पाहिले तरी लक्षात येते.”
कोणत्याही प्रदर्शनीत पाहा मोठ्या चित्रांकडे रसिक सरकला जातो मात्र, लहान चित्रांकडे रसिक खऱ्या अर्थाने ओढल्या जातो, असे निरीक्षण मुळीक यांनी नोंदविले.
विवेक यांनी आपल्या चित्रांचा दर्जा सातत्याने उंचावत ठेवला आहे. त्यांची चित्रे पाहताना ‘ स्माॅल इज ब्युटीफूल ‘ या उक्तीची आठवण होते. विषय कोणताही असला तरी कमीत कमी आकाराद्वारे आणलेला परिणाम चित्रांची आकर्षकता वाढत आहे याकडे मुळीक यांनी लक्ष वेधले.
२००४ झाली मी कला महाविद्यालयात होतो तेव्हापासून सरांना ओळखतो. सातत्याने काम करण्याची ऊर्जा त्यांकडून आम्हाला मिळते आणि आम्ही कायमच प्रभावित प्रोत्साहित होते असे विवेक दहिवले म्हणाले.
ग्रीष्म ऋतूमधील फुलांचा बहर, रंगीबेरंगी लँडस्केप्स आणि डोळ्यांना सुखावणारी अनेकविध ठिकाणांची चित्रे या प्रदर्शनीमध्ये पुणेकर रसिकांना पाहता येणार आहेत. चित्रकार विवेक दहिवले हे आश्वासक युवा चित्रकार असून त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा बेस्ट पोट्रेटसाठीचा व्ही ए माळी पुरस्कार  मिळाला आहे. ग्रीष्म या प्रदर्शनामध्ये असलेली सुमारे ६० चित्रे जलरंग माध्यमातील असून ग्रीष्म ऋतूची अनुभूती प्रेक्षकांना मिळेल. नेहा दहिवले यांनी स्वागत केले तर सज्जला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading