Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

समाजाच्या प्रोत्साहनाने दिव्यांग देशासाठी मोठे योगदान देतील- सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे


पुणे : प्रत्येकात न्यूनता असते. आपण सर्व जण अपूर्ण आहोत. ही न्यूनता परिपूर्णतेच्या दिशेने जाण्यासाठी ईश्वराने समाज म्हणून आपल्याला दिव्यांगांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी सेवेची संधी दिली आहे. समाजाने दिव्यांग व्यक्तीमध्ये काय नाही, यापेक्षा काय आहे याचा विचार करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते देशासाठी मोठे योगदान देऊ शकतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी केले.
समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पुण्यातील महर्षी कर्वे संस्थेत दोन दिवस हे अधिवेशन सुरू राहणार आहे. यावेळी अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरकार्यवाह होसबाले पुढे म्हणाले, दिव्यांग पुनर्वसनासाठी अनेक प्रयोग होत आहेत. ब्रेल ही भारतीय भाषा म्हणून पुढे येण्यास सक्षमने योगदान दिले आहे. दिव्यांगांनी न्यूनतेवर मात करत आपल्या प्रतिभेने सामान्य माणसांपेक्षाही असामान्य कर्तुत्व गाजवले आहे.आपण त्यांचा स्वाभिमान जपत त्यांना प्रोत्साहन, आत्मविश्वास आणि सहयोग द्यायला हवा.अनेक दिव्यांग व्यक्तींनी आपल्या परिवाराच्या मदतीने न्यूनता दूर केली असून त्यांचे पालकच त्यासाठी मोलाची कामगिरी करताना आपल्याला दिसतात. परंतु सध्या सिंड्रोम, मेंदूची अकार्यक्षमता, डाऊन सिंड्रोम,ऑटिझम असे अनेक प्रकार पुढे येत आहे त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करून व्यापक प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले..


स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आशीर्वाद देताना अनेक दिव्यांगांनी आपल्या कामगिरीने समाजाला प्रेरणा देत इतिहास रचला आहे. मनोबल हे मानवाचे सर्वोच्च बळ आहे. सर्व अवयव शाबूत असूनही ज्याच्याकडे मनोबल नाही तो दुर्बळ बनतो आणि ज्यांच्याकडे प्रखर मनोबल आहे, ते दिव्यांग असूनही सक्षम असतात ज्याने आत्मविश्वास गमावला त्याने सारे गमावले. हे भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान मांडत अंतःकरणात कोणतीही दुर्बलता ठेऊ नका आत्मविश्वास सतत जागृत ठेवा असा मौलिक सल्ला दिला. सर्वोच्च सेवा करणे ही सार्थकता असून अंत:करण शुद्धीने भारतमातेप्रती समर्पण भाव कायम ठेवा असे सांगितले.
यावेळी प्रेरणादायी दिव्यांग अतिथी म्हणून इंदूरचे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पद्मश्री सत्येंद्रसिंग लोहिया, महाबळेश्वरचे प्रसिद्ध उद्योजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भावेश भाटिया, अभिनेत्री गौरी गाडगीळ, अहमदाबादचे प्रसिद्ध आयटी उद्योजक शिवम पोरवाल यांचा विशेष सत्कार सक्षमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलाकांत पांडे, डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते करण्यात आला. कमलाकांत पांडे यांनी प्रास्तविक केले. स्वागत समितीचे अध्यक्ष ऍड. एस के जैन यांनी स्वागत केले. सक्षमचे नूतन महामंत्री उमेश अंधारे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

प्रारंभी पुष्पार्चन झाल्यानंतर केरळ येथील प्रदीप यांनी संघटन मंत्र सांगितले. सुमन चतुर्वेदी आणि प्रशांत यांनी सक्षम संस्थेचा दृष्टिकोन आणि संकल्पना सांगितली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सक्षमच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, तसेच डॉ. निर्मला सरदेसाई, दिलीपसिंग बहरेचा या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रीती पोहेकर यांनी सूत्रसंचालन केले. पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे यांनी आभार मानले. भारतीय सांकेतिक भाषेतून द्विभाषिक म्हणून माधुरी गाडेकर यांनी काम केले. सक्षमचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे यांनी आभार मानले.या अधिवेशनाला देशभरातून ५०० जिल्ह्यातील १५०० प्रतिनिधी उपस्थित आहेत. सकाळी सुरेश पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे ध्वजारोहण झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading