Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

भारताच्या गौरवशाली इतिहासाचा खूप मोठा भाग अजूनही अज्ञात – पांडुरंग बलकवडे यांचे मत

पुणे : हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातीने आपले योगदान दिले आहे. सगळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य उभे राहिले आहे, परंतु  भारताच्या या गौरवशाली इतिहासाचा मोठा भाग अजूनही अज्ञात आहे, कारण पाच कोटी कागद अजूनही दफ्तरखान्यात  पडून आहेत. आम्ही फक्त त्यातले लाख – दोन लाख कागद अभ्यासून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आपल्या गौरवशाली इतिहासाला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी केले.

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने मराठा शौर्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची अष्टधान्य तुला आणि धार पवार भूषण पुरस्काराचे आयोजन ऐतिहासिक लाल महालात  करण्यात आले होते.  यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल. एम. पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पवार, अदानी इलेक्ट्रिसिटीचे सहाय्यक उपाध्यक्ष महेश पवार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, पुणे शहर संपर्कप्रमुख गजानन पवार, स्मिता पवार यावेळी उपस्थित होते.

अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्त्या अमृता पवार, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांची यावेळी धान्यतुला करण्यात आली. तर युवा उद्योजक चैतन्य पवार, उद्योजिका विद्या पवार, शेती संशोधक प्रकाश पवार यांना धार पवार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धान्यतुलेतील धान्य संकल्प वसतीगृहात देण्यात आले.

पांडुरंग बलकवडे म्हणाले,   एक हजार वर्षांपूर्वी आपला देश जगासाठी वंदनीय होता. तसाच येणाऱ्या काळात हिंदुस्थान जगाच्या गुरुस्थानी असेल. आपण एकत्र येऊन उद्याचा भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्तान घडवू,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एल.एम. पवार म्हणाले, इतिहासात आपल्या वंशाजाकडून खूप मोठे कार्य झाले. त्या कार्याची आपण आठवण ठेवायची आणि आत्ता या काळात आपल्या समाजाला, देशाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला पाहिजे.

महेश पवार म्हणाले, धार पवार घराण्यातील सर्वजण आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. भविष्यातील महाराष्ट्र घडवणे आपल्या हातात आहे. शूर वीरता प्रत्येक पवारांमध्ये आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील आपल्या बांधवांच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीला जा, असेही त्यांनी सांगितले.

सर्वेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. सागर पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading