एल अँड टी फायनान्स आणि एशियन डेव्हलपमेन्ट बँकेमध्ये करार
पुणे : भारतातील आघाडीची नॉन बँकींग वित्तकंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्सने एशियन डेव्हलपमेन्ट बँके (एडीबी) बरोबर 125 कोटी यूएस डॉलरचा वित्तपुरवठा करार केला आहे. हा निधीचा वापर भारतातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांसाठी करण्यात येणार आहे.
वित्तपुरवठ्यात एडीबीकडून तसेच विकासाला पाठबळ देणाऱ्या अन्य सहकारी विकास संस्थांकडून अतिरिक्त साडेबारा कोटी यूएस डॉलरच्या एकत्रित अर्थसहाय्य कराराचाही समावेश आहे. या वित्तपुरवठ्यातील 40 टक्के रक्कम ही महिला कर्जदारांना पुरविली जाणार आहे, तर उर्वरित रक्कम शेतकरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना (एमएसएमई) तसेच नवीन दुचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज देण्याकरिता वापरली जाणार आहे.
याप्रसंगी बोलताना एल अँड टी फायनान्सचे समुह मुख्य वित्त अधिकारी सचिन जोशी म्हणाले, एडीबीसोबतची ही भागीदारी विकासाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. समाजातील आर्थिक दरी भरून काढण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी देशभरात विविध पातळीवर आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमच्या कंपनीसाठी हे दीर्घकालीन कर्ज निधीच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. भारतातील सेवेपासून वंचित असलेल्या तसेच पिछाडीवर पडलेल्या राज्यांमध्ये आमच्या ऑन-कर्ज उपक्रमांद्वारे नागरिकांना विशेषत: महिला, शेतकरी आणि एमएसएमईच्या सक्षमीकरणासाठी एक सहाय्यकारी घटक
बनण्याचा प्रयत्न करत आहे.”
ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सुमारे 70 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे बँक खाते नाही आणि 87 टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही. या विषमतेचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होतो. फक्त 14 टक्के महिलांनाच कर्ज मिळते. भारतात पिछाडीवर असलेल्या राज्यांतील ग्रामीण आणि निम-शहरी भागात कर्ज वितरणावर लक्ष केंद्रित करून, हा प्रकल्प भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उद्दिष्टांशी धोरणात्मकरित्या सारखा आहे.
एडीबीच्या खासगी क्षेत्रप्रणाली विभागाच्या महासंचालिका श्रीमती सुझान गॅबरी म्हणाल्या, ग्रामीण भारतात देशातील 65 टक्के लोकसंख्या शेतीत गुंतलेली असून राष्ट्रीय उत्पन्नात ते जवळपास निम्मे योगदान देते. मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रदान करण्याची क्षमता असलेल्या एल अँड टी फायनान्स सोबतची ही भागीदारी एडीबीला महिला कर्जदारांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून वैयक्तिक उदरनिर्वाह आणि लहान व्यवसायांना आर्थिक पाठबळ देण्याची संधी प्रदान करते. “
