डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मोफत मधुमेह जागृती आरोग्य शिबिरे आणि बालरोग सहाय्य उपक्रमाचे आयोजन
पुणे: डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या वतीने २२ आणि २४ नोव्हेंबर रोजी मोफत मधुमेह जनजागृती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेतील कम्युनिटी मेडिसीन अर्थात सामुदायिक औषध विभागाच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड आणि आळंदी परिसरातील रहिवाशांसाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, २३ नोव्हेंबर रोजी, बालरोग विभागातील एंडोक्राइनोलॉजी डॉक्टरांच्या गटाने पुढाकार घेऊन मधुमेह दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी टाईप-१ मधुमेह असलेल्या मुलांच्या पालकांसाठी ‘पालक सहाय्य गटा’चे उद्घाटन करण्यात आले.
नित्याशा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषिनी नौरेम या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा माने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहारावर भर दिला. डॉ. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ञ आणि एंडोक्राईनोलॉजिस्ट डॉ. सुप्रिया गुप्ते आणि डॉ. सजिली मेहता यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यांच्या शंकाचे निरसन केले.
प्रख्यात आहारतज्ञ वैशाली मडकईकर आणि आहारतज्ञांच्या गटाने मधुमेह असलेल्या मुलांसाठी योग्य आहार, आहाराचे प्रमाण, पोषणमूल्ये याबद्दल पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड आणि आळंदी विभागातील आरोग्य शिबिरांमध्ये आरबीएस, एच बी ए १ सी, बीपी आणि बीएमआय या चाचण्या मोफत करण्यात आल्या. त्यावेळी जेरियाट्रिक मेडिसिन विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अनु गायकवाड, सामुदायिक औषध विभागाच्या प्रमुख, डॉ. हेतल राठोड यांनी सहभागी लोकांना संबोधित केले. डॉ. अनु गायकवाड यांनी मधुमेहामागील कारणे, त्याचे प्रकार, लवकर निदानाचे फायदे, औषधांची भूमिका याविषयी माहिती दिली. ओपीडीतील काही अनुभवही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अनु गायकवाड म्हणाल्या, “आजची जीवनशैली आणि ताणतणाव या मधुमेहासाठी मुख्य चिंता आहेत. तथापि, हिरव्या भाज्या आणि फळे यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे, नियमित चालणे, सायकल चालवणे,पुरेशी विश्रांती घेणे आणि वजन नियंत्रित ठेवणे अशा आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास मधुमेह प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. लोकांनी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैलीतील साध्या परंतु, प्रभावी बदलांना प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. दैनंदिन दिनचर्येतील लहान बदलांचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. केवळ मधुमेह नियंत्रणासाठीच नाही, तर एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. ”
डॉ. हेतल राठोड यांनी तरुण व्यक्तीमधील असंसर्गजन्य रोगांच्या (NCDs) वाढत्या प्रमाणावर प्रकाश टाकला. निरोगी जीवनशैली, व्यायाम, संतुलित आहार आणि तंबाखू, दारू यांचे सेवन कमी करून लवकरात लवकर प्रतिबंध करण्याच्या गरजेवर भर दिला.
कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या मेडिकल जर्नलचे मुख्य संपादक डॉ. अमिताव बॅनर्जी म्हणाले, “भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेतील बदलत्या जीवनशैलीमुळे एका जागी बसून राहण्याच्या सवयीना चालना मिळत आहे. यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असून, तरुण वयात मधुमेहाचा धोका वाढत आहे. तसेच भारतीयांमधील विशिष्ट अनुवांशिक घटक त्यांना मधुमेहासाठी अधिक संवेदनाक्षम बनवतात, हे एक गंभीर आव्हान आहे, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.”
आरोग्य शिबिरांसोबतच, सामुदायिक औषध विभागातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी ‘मधुमेहाची काळजी’ या संकल्पनेवर आधारित पथ नाटय सादर केले. या नाटकात मधुमेहाची लक्षणे, गुंतागुंत आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रकाश टाकण्यात आला.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय सतत विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या कल्याणाप्रती आपली कटिबध्दता दर्शविते आणि मधुमेहाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक प्रयत्नांमध्ये योगदान देते.
