Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

वेळेच्या व्यवस्थापनाला विवेकाची जोड अत्यंत महत्वाची असते – ज्येष्ठ संशोधक वैदेही लिमये यांचे प्रतिपादन 

पुणे : ज्ञान ही आपली परंपरा आहे. आपल्याला हे कळले आहे ते इतरांना समजावून सांगणे ही अतिशय चांगली भावना आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे व्यवस्थापन हा आपल्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, मात्र या वेळेच्या व्यवस्थापनाला विवेकाची जोड अत्यंत महत्वाची असते असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ व हॅनोव्हर विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक वैदेही लिमये यांनी रविवारी व्यक्त केले.  

साकेत प्रकाशन आणि भावार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने  कांचन दीक्षित लिखित   ‘टाइम अँड सेल्फ मॅनेजमेंट’ या पुतसकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी वैदेही लिमये बोलत होत्या.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश मंडलिक (सीईओ व एमडी, सेटको स्पींडल्स इंडिया  प्रा. लि.) होते. यावेळी प्रकाशक प्रतिमा भांड, भावार्थ च्या श्रद्धा मयेकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुस्तक अतिशय देखणे झाले आहे असे सांगताना वैदेही लिमये म्हणाल्या, कांचन दीक्षित यांचे हे पुस्तक अनेक विषयांना स्पर्श करते, पुतसकात फक्त मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष  जगण्यातील उदाहरणे देऊन अबालवृद्धाना फक्त आवडणार नाही तर आपला हितचिंतक सांगत आहे यांची जाणीव होईल यात शंका नाही.  पुस्तकाचे टायटल आणि त्यामधील मजकूर यांचा समतोल यांची सांगड अत्यंत काळजीपूर्वक घातल्याचे दिसते. आपण काहीतरी नवीन करायचे ठरवले की त्यावर टीका होते किंवा अडथळे निर्माण केले जातात त्यावर नेमकी कशी  मात करायची याचे संध्या सोप्या भाषेतील मार्गदर्शन आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. 

वेळेचे व्यवस्थापन करणे म्हणजे घडाळ्याच्या काट्यावर धावणे नाही, यश, कीर्ती, मान सन्मान मिळवणे किंवा त्यामागे धावणे याला जीवनाचे किंवा वेळेचे नियोजन म्हणता येत नाही.  तर कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे याची जाणीव निर्माण होणे गरचेचे आहे, त्याशिवाय यशस्वी होता येत नाही, हे लक्षात घेणे महत्वाचे असेही लिमये यांनी सांगितले. 

अध्यक्षीय भाषणात राजेश मंडलिक म्हणाले, वेळेवर न पोहोचणे हा आपल्याकडे राष्ट्रीय रोग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही अशी परिस्थिती आहे. मी एका कंपनीचा सीईओ असतानाही मला टाइम मॅनेजमेंट जमात नव्हते, यांचा फटका मला काही वेळा बसला आहे. आपल्याकडे एखाद्या  व्यक्तीला थोडा उशीर झाला तरी समोरचे काही बोलत नाहीत किंवा त्याचा कामावर फारसा फरक पडत नाही हा समाज निर्माण झालेला आहे, अशा लोकांसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरणार यात शंका नाही. 

आपल्या मनोगतात लेखिका कांचन दीक्षित म्हणाल्या की, बाहेरच्या गोष्टी बदलल्या पाहिजेत यासाठी आपण सातत्याने धडपडत असतो मात्र आपल्यामध्ये काही बदल झाला पाहिजे यांची जाणीव अनेकांना होत नाही. मला वाटते आपण मोबाइल जसा अपडेट करतो तसेच आपले मन सुद्धा अपडेट करता आले पाहिजे. वेळ ही एक कल्पना आहे तिला बंदिस्त करता येत नाही यामुळे प्रत्येकाच्या जीवनात वेळेचे व्यवस्थापन ही अत्यंत महत्वाची बाब आहे. 

प्रकाशक प्रतिमा भांड यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणातून या पुस्तकाच्या प्रकाशना मागील भूमिका विशद केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी साळवेकर, प्रणव कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading