Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

मराठी उद्योजक घडविण्याची गरज – दिलीप कोटीभास्कर

    पुणे : मराठी माणूस हा आतापर्यंत नोकरी मागणारा किंवा नोकरीच्या माध्यमातून इतरांच्या विकासासाठी काम करणारा म्हणून ओळखला जात होता. परंतु हळूहळू ही ओळख बदलत आहे, नोकरी मागणा-यांपेक्षा नोकरी देणारा व्यावसायिक घडविणे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळेच तरुणांना अधिकाधिक उद्योगांकडे वळवून मराठी उद्योजक घडविणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर यांनी व्यक्त केले.

    अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी स्वागताध्यक्ष चंद्रशेखर जोशी, पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद माणकीकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव आदी यावेळी उपस्थित होते. संस्थेतर्फे माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी, माधव भंडारी, पुणे शहर पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    दिलीप कोटीभास्कर म्हणाले, पुढील पन्नास वर्ष देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. अशावेळी केवळ नोकरी मागणारा तरुण घडविण्यापेक्षा नोकरी देणारा तरुण आपण घडविला तर समाजामध्ये अधिकाधिक नोकऱ्या निर्माण होऊ शकतील. आतापर्यंत मराठी माणूस हा केवळ नोकरी मागणारा आणि त्यानुसार शिक्षण घेणारा म्हणून ओळखला जातो. परंतु आता ही ओळख पुसण्याची गरज आहे. उद्योग करण्याची मानसिकता आपण तरुणांमध्ये रुजविले पाहिजे.

    माधव भंडारी म्हणाले, कोणतीही संस्था पन्नास वर्षे अविरत कार्यरत ठेवणे, अत्यंत अवघड काम आहे. या संस्थेने केवळ काही विशिष्ट समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाचा विचार करून त्यानुसार आपले काम केले आहे. त्यामुळेच समाजातील तळागाळातील माणूस या संस्थेची जोडला गेलेला आहे. त्यामुळे या संस्थेची पुढील पन्नास वर्षे हे निश्चितच गौरवशाली असणार आहेत.

    सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. मध्यवर्ती संस्थेतर्फे पुणे केंद्राला यावेळी ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. स्वरोत्सव या हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. मुग्धा पंडित यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद माणकीकर यांनी स्वागत केले. विश्वनाथ भालेराव यांनी प्रास्ताविक केले. अनिल शिदोरे यांनी आभार मानले.

    Leave a Reply

    Discover more from Maharashtra Lokmanch

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading