साप्रस मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश
पुणे- समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुदृढ आणि निरोगी पिढी तयार होणे गरजेचे आहे. समाजातील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेता त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी जनजागृती व प्रत्यक्ष भरीव काम करण्याची नितांत गरज आहे. नवरात्रीच्या निमित्ताने साप्रस मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी देण्यात आलेल्या संदेश उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी व्यक्त केले.
श्री पोच्चम्मा माता मंदिर यांच्यावतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त यंदा सहाव्या वर्षी देखील मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन मध्ये दीड हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे सल्लागार अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू राहुल जाधव, आमदार सिद्धार्थ शिरोळे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड,मॅरेथॉनचे संयोजक माजी नगरसेवक अभय सावंत, रश्मीताई सावंत, साप्रस मिनी मॅरेथॉन संयोजन समितीचे दीपक बिडकर, सुकेश जाधव, अभिषेक बट्टेल्लू ,तेजस उरडे,राकेश बट्टेल्लू, प्रवीण वडेलवार, सुमित पोनम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू राहुल जाधव यांनी व्यसनमुक्ती व गुन्हेगारीवर मात करून आयुष्यात यशस्वी खेळाडू झाल्याचा प्रवास उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणात कथन केला. व्यसनमुक्ती ही काळाची मोठी गरज असून समाजातील प्रत्येक घटकांनी यामध्ये आपल्या सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. समाजातील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन मॅरेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी तरुण व समाजातील सर्व घटकांमध्ये व्यसनांची जनजागृती करण्यासाठी हा विधायक उपक्रम राबवित असल्याची माहिती मॅरेथॉनच्या संयोजक अभय सावंत व दीपक बिडकर यांनी दिली. आळंदी रस्त्यावरील साप्रस पोलीस चौकी येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली.
. खुल्या गटातील11 किलोमीटरची मॅरेथॉन अभिषेक देवकाते याने तर मुलींमध्ये वृषाली उत्तेकर हिने पूर्ण केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक तसेच शिक्षक प्रशिक्षक व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शारदीय नवरात्रीनिमित्त आयोजित साप्रस मिनी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थी,युवा वर्ग तसेच नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
