Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

नवीन शैक्षणिक धोरणात मनुष्य घडविण्याचे सामर्थ्य आहे – दत्तात्रेय होसबाळे

पुणे : आजची हिंदुस्थानातील पिढी ही गैरसमजांनी वेढलेली आहे. वसाहतवादाच्या प्रभावामुळे बौद्धिक गुलामगिरी अजूनही काही ठिकाणी दिसून येते. प्रत्यक्षात सुसंस्कृत समाज घडविण्याकरिता उत्तम मानवी मूल्ये जपण्याचे सामर्थ्य असायला हवे. भारतीय ज्ञानपरंपरेला अनुसरून असे ज्ञान वेदोपनिषदांमध्ये आहेच. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मनुष्य घडविण्याचे सामर्थ्य आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकवणे, पोषक वातावरण तयार करणे सोपे होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळी तर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रकाशात शिक्षकांची भूमिका’ या विषयावर उद्बोधनपर कार्यक्रमाचे आयोजन स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी शि.प्र.मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सोहनलाल जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे आदी उपस्थित होते. शि.प्र. मंडळीच्या इतिहासाचा मागोवा घेणा-या ‘ज्ञानव्रती’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते  झाले.

दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विशेष कौशल्ये आणि परिस्थितीला अनुसरून कौशल्य यामध्ये संवाद, व्यवस्थापन, संघकार्य, स्वयंशिस्त, ध्येय, जागतिक नागरिकत्व यांचा समावेश आहे. विश्व नागरिक हे तत्व फार प्राचीन असून ‘वसुधैव कुटुम्बकम’ यामध्ये दिसलेच आहे. विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दृष्टया पोषक वातावरण तयार करणे, ही शिक्षकांची जबाबदारी आहे. पारंपरिक व सैद्धांतिक वर्ग सोडून प्रयोगशील, कायार्नुभवात्मक शिक्षणाला महत्व देण्यासोबतच परीक्षेकरिता नवनवीन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, शिक्षक हे केवळ माहिती पुरविणारे नाहीत तर, शिक्षणप्रक्रियेमध्ये प्रेरणा देणारे घटक असायला हवेत. त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त माहिती न देता शहाणपण, व्यवहारज्ञान शिकवणे अपेक्षित आहे. याकरिता स्वत: संशोधन करणे, आजन्म विद्याथीर्वृत्तीने आपले ज्ञान अद्ययावत करणे आवश्यक आहे. भारतीय ज्ञानपरंपरेविषयी जागरुकता निर्माण करुन त्याविषयी जिज्ञासा, स्वाभिमान निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.सोहनलाल जैन म्हणाले, शिक्षणाच्या वाटा निवडताना संदिग्धता ही वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांच्या मनात दिसते. अशा वेळी शिक्षण पद्धतीत सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी शिक्षणसंस्थांसह शिक्षकांची भूमिका देखील महत्वाची आहे. सन १९८६ नंतर अनेक वर्ष शैक्षणिक धोरण आलेच नव्हते. ३४ वषार्नंतर आलेल्या या धोरणानुसार आता शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. त्याकरिता हे शैक्षणिक धोरण आले असल्याचे त्यांनी सांगितले. शि.प्र.मंडळीचे डायरेक्टर ऑपरेशन्स श्रीरंग कुलकर्णी यांनी मान्यवरांचे परिचयव कार्यक्रमाचे संचालन केले. उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ सदस्य, विविध संस्था प्रमुख, संस्थांमधील शिक्षक-प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading