छत्रपती शिवरायांचे कार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्याची गरज – डॉ. आर. एन. सिंग
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले असे राजे होते की ज्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी स्वराज्य निर्माण केले. त्यांचे शौर्य आणि शिकवण आजच्या काळातही गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व आणि कार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्याची आज नितांत गरज आहे. शिवविचारांनी प्रेरित झालेले तरुणच ख-या अर्थाने हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पुढाकार घेऊ शकतात, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर.एन.सिंग यांनी व्यक्त केले
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे ३५० वे शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष व विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवानिमित्त विमलाबाई गरवारे प्रशालेच्या प्रांगणात श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेच्या समारोप सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ प. योगीराज महाराज गोसावी ( पैठणकर), भारतीय हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक, विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री संजय मुद्राळे, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, केंद्रीय सहमंत्री दादा वेदक, परिषदेचे प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, प्रांताचे कोषाध्यक्ष महेंद्र देवी, बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहप्रमुख नितीन महाजन, पूर्व पुणे विभागाचे मंत्री धनंजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. डेक्कन येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला. यावेळी केशव शंखनाद पथकाने शंखनाद देखील केला.
डॉ.आर.एन. सिंग म्हणाले, शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर तयार होत आहे, हे मंदिर आंतरराष्ट्रीय पातळीवरील हिंदूंचे तीर्थक्षेत्र असेल. अयोध्येतील राम मंदिर हे सर्व जगातील हिंदू एकात्मतेचे प्रतीक असेल. हिंदू राष्ट्राची निर्मिती म्हणजे इतर धर्माचा द्वेष नाही, परंतु मुसलमानांनी पाकिस्तानी मुसलमान म्हणून या देशात राहण्यापेक्षा हिंदुस्थानी मुसलमान म्हणून राहावे, ही आमची हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे. तुम्ही हिंदूंचा आदर केला तर आम्ही तुमचा आदर करु. परंतु हिंदू विरोधात गदर करण्याची हिम्मत करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ह.भ प. योगीराज महाराज गोसावी( पैठणकर) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे साधू-संतांच्या विचारांनी प्रेरित आणि मार्गदर्शन केलेले होते. साधू -संतांच्या विचारांची आजही गरज आहे. साधू संतांनी लोकांना नेभळट किंवा टाळकुटे कधीही केलेले नाही. तर साधू संतांनी कायम शौर्याची भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही वारकरी संप्रदायाची सर्वसामावेशक शिकवण अंगीकारल्यामुळे ते सर्वसामान्यांचे राजे होऊ शकले.
शशिकांत ओक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व हे सर्वांगाने सर्वोच्च आहे. एक सरसेनापती ते कुशल प्रशासक हे त्यांचे व्यक्तिमत्व अभ्यासण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मोगलांनी वापरलेला ‘गनिमी कावा’ हा शब्द वापरू नये, कारण गनिम म्हणजे शत्रु असा होतो. त्या ऐवजी धूर्त युद्धशास्त्र असा शब्द वापरला तर योग्य होईल.
