महालक्ष्मी मंदिरातील ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवात’ धार्मिकतेसोबत सामाजिक उपक्रम
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ रविवार, दिनांक १५ आॅक्टोबर पासून होणार आहे. दिनांक १५ ते २४ आॅक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रथमच महिला मेट्रो चालक व पदाधिका-यांचा सन्मान सोहळा तसेच भारताच्या चांद्रयान यशस्वी मोहिमेबद्दल महिला शास्त्रज्ञांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, लेखिका-कवयित्री सत्कार, कथक व फ्युजन नृत्य, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, महिला लष्करी अधिकारी सन्मान असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
रविवारी (दि.१५) सकाळी ८.३० वाजता चितळे उद्योगसमूहाचे गोविंद चितळे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६.३० वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन होणार आहे. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.
सोमवारी (दि.१६) पहाटे ५ वाजता श्रीसूक्त पठण होणार आहे. यावेळी पारंपरिक वेशात ५ ते ७ हजार महिला सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे या उपस्थित राहणार आहेत. तर, सायंकाळी ५ वाजता महिला मेट्रो वाहकांचा व कर्मचा-यंचा सन्मान सोहळा कार्यक्रम मंदिरात होईल. मंगळवारी (दि.१७) सायंकाळी ५ वाजता महिला शास्त्रज्ञांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा होईल.
बुधवारी (दि.१८) साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लेखिका व कवयित्रींचा गौरव व त्यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता आरती होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता फ्यूजन नृत्य सादरीकरण देखील होईल. ललिता पंचमीच्या दिवशी गुरुवारी (दि.१९) विविध कंपन्यांमधील महिला एचआर मॅनेजर यांच्या हस्ते महाआरती व त्यांचा सन्मान सोहळा सायंकाळी ५.३० वाजता होणार असून रात्री ८.३० वाजता नादब्रह्म केरला वाद्य पथकाद्वारे वादनसेवा होणार आहे.
*कन्या पूजनासह विविध शाळातील शिक्षकांचा आगळावेगळा भोंडला
शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी ५ वाजता वंचित विशेष घटकातील मुलींचे कन्यापूजन हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध सामाजिक संस्थेतील मुलींचे कन्यापूजन होईल. तसेच रात्री ८.३० वाजता रुचिरा केदार यांचा सांगितीक कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.२१) सायंकाळी ५ वाजता पुणे शहरातील विविध शाळांतील शिक्षकांचा भोंडला होणार आहे. रविवारी (दि.२२) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिनाचा गौरव सोहळा नारी तू नारायणी या कार्यक्रमात होईल. यामध्ये सायली आगवणे, मिता बॅनर्जी, सोनाली देशपांडे या महिलांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री ८.३० वाजता आर्ट आॅफ लिविंग तर्फे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजता महिला पोलीस अधिकारी व शासकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२४) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. तर, सायंकाळी ५ वाजता महिला लष्करी अधिकारी यांचा सत्कार होणार आहे. सायंकाळी हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम, तसेच रात्री ८.३० वाजता मैथिली ठाकूर यांचा भजन व संगीताचा कार्यक्रम होईल.
उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
