Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

नवी दिल्ली  : राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व आठ आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.

या शिष्टमंडळामध्ये विधानसभा उपाध्यक्ष  झिरवाळ, मंत्री आत्राम यांच्यासह सर्वश्री सुनील भुसारा, दौलत दरोडा, हिरामण खोसकर, शांताराम मोरे, शिरीषकुमार नाईक, काशिराम पावरा, डॉ.देवराम होळी, राजेश पाडवी व आमश्या पाडवी यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.

या बैठकीनंतर, झिरवाळ यांनी माध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. आदिवासी समाजातील  समस्या मांडाव्यात यासाठी दिल्लीत शिष्टमंडळासह दाखल झाल्याचे सांगितले व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी भेट घेतल्यानंतर, विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी  सपत्नीक व आमदारांसह महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत विक्रमगडचे (पालघर)  आमदार सुनील भुसारा व इगतपुरी (नाशिक) आमदार हिरामण खोसकर होते. यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

झिरवाळ म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करून महत्त्वपूर्ण कार्य केले. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कार्यालयाचे महत्त्व आजही कायम आहे. या केंद्राच्या माध्यमातून राजधानीत महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबविणे, संस्कृतीचे संवर्धन करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. नवमाध्यमांच्या युगात परिचय केंद्रही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading