महायुतीत भाजप मोठा भाऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्यावर अद्याप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये नेमके काय चाललेय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस-पवार यांचे एकत्रित सरकार आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तिन्ही पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. भाजपच्या वतीने निवडणुकांच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजप पदाधिका-यांच्या बैठकाही सुरू आहेत. दादरमध्येही अशाच महत्त्वाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच बॉस असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर सत्तेत सहभागी असलेल्या इतर दोन पक्षांच्या प्रतिक्रिया काय येतात, याकडे लक्ष लागले आहे.
