सैनिकांप्रमाणे कलाकारांचे योगदान महत्त्वाचे – डॉ. प्रभा अत्रे
पुणे – देशांच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रमाणे कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या कलाकारांचे योगदान ही महत्त्वाचे असल्याचे मत, ज्येष्ठ गायीका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक मार्केट यार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे सुरू आहे. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. अत्रे बोलत होत्या.
संस्कार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री अश्विन दळवी, उपाध्यक्ष मैसुर मंजुनाथ, बौद्धिक प्रमुख स्वांतरंजन, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतार वादक उस्ताद उमान खान, पुणे महानगराचे अध्यक्ष व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदुषी प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक सांस्कृतिक आक्रमणे होत आहेत. अनावधानाने आपण ही त्याच्या अधीन जात आहोत. आपण भारतीय असल्याचे आपण विसरत आहोत. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या दृष्टिने संस्कार भारतीचे कार्य महत्त्वाचे आहे.’
अत्रे पुढे म्हणाल्या, ‘शास्त्रीय कला केवळ मनोरंजन करण्यापुरत्या मर्यादित नसतात. जगात जे काही सुंदर, मंगल आणि शाश्वत आहे त्याची अनुभूती या कलांमधून होत असते.’
